Alex Hales Record In T20 Cricket: इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज अॅलेक्स हेल्सने टी-२० क्रिकेटमध्य मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धा खेळत असलेल्या अॅलेक्स हेल्सने टी-२० क्रिकेटमध्ये १४००० धावा पूर्ण करण्याचा पल्ला गाठला आहे. कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत फलंदाजी करताना कायरन पोलार्डने हा विक्रम आपल्या नावावर केला होता. आता अॅलेक्स हेल्सने १४००० धावांचा पल्ला गाठला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो तिसराच फलंदाज ठरला आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वेस्टइंडिजचा माजी विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. ख्रिस गेलने आपल्या टी-२० कारकिर्दीत ४६३ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना १४५६२ धावा कुटल्या. त्यानंतर कायरन पोलार्डने एक दिवसाआधीच टी-२० क्रिकेटमध्ये १४००० धावांचा पल्ला गाठला. दरम्यान अॅलेक्स हेल्सने हा विक्रम मोडून काढला आहे. त्याने ५०९ सामन्यांमध्ये १४०२४ धावा केल्या आहेत. तर पोलार्डच्या नावे टी-२० क्रिकेटमध्ये ७१३ सामन्यांमध्ये १४०१२ धावा करण्याची नोंद आहे. या दोघांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी पोहोचण्याची रस्सीखेच सुरूच राहणार आहे. कारण दोघेही टी-२० क्रिकेटमध्ये अजूनही सक्रिय आहेत. दरम्यान ख्रिस गेलचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सर्वात आधी कोण मोडणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे आहेत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

ख्रिस गेल- १४५६२ धावा
अॅलेक्स हेल्स- १४०२४ धावा
कायरन पोलार्ड- १४०१२ धावा
डेव्हिड वॉर्नर- १३५९५धावा
शोएब मलिक- १३५७१ धावा

वेस्टइंडिजमध्ये सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत अॅलेक्स हेल्स ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाकडून खेळत आहे. या स्पर्धेत गयाना अॅमेझॉन वॉरियर्स संघाविरूद्ध फलंदाजी करताना त्याने तुफान फटकेबाजी करत ४३ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि ७ षटकार खेचले. यादरम्यान त्याने १७२.०९ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. या सामन्यात ट्रिनबागो नाईट रायडर्सचा संघ १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना अॅलेक्स हेल्सच्या वादळी खेळीच्या बळावर ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाने दिलेलं आव्हान १७.२ षटकात पूर्ण केलं आणि सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला.