ICC Women’s World Cup 2025: येत्या काही दिवसात आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन संयुक्तरित्या भारत आणि श्रीलंकेत केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज आहेत. सर्व संघांनी आपल्या स्क्वॉडची घोषणा केली आहे. भारतीय संघाची जबाबदारी कर्णधार हरमनप्रीत कौरच्या हाती सोपवण्यात आली आहे. भारतात बऱ्याच वर्षांनी महिला वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्याआधी आयसीसीने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

आयसीसीचा ऐतिहासिक निर्णय

या स्पर्धेसाठी आयसीसीकडून अंपायर्स आणि मॅच रेफ्रीची घोषणा करण्यात आली आहे. कौतुकास्पद बाब अशी की, या स्पर्धेसाठी केवळ आणि केवळ महिला अधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ही आयसीसीची पहिलीच अशी स्पर्धा असणार आहे. जिथे अंपायर्स आणि अधिकारी केवळ महिला असणार आहेत. आयसीसीने घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे.

भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू आणि पहिल्या महिला मॅच रेफ्री जीएस लक्ष्मी या ४ सदस्यीय मॅच रेफ्री पॅनलचा भाग असणार आहेत. तर अंपायरिंगसाठी जॅकलिन विलियम्स, सू रेडफर्न, क्लेयर पोलोसेक, लॉरेन एजेनबेग, किम कॉटन, वृंदा राठी, एन जननी आणि गायत्री वेणुगोपालन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेसाठी या अधिकाऱ्यांची झाली निवड

मॅच रेफ्री : जीएस लक्ष्मी, मिशेल परेरा,ट्रूडी अँडरसन, शेंड्रे फ्रिट्ज.

अंपायर्स: जॅकलिन विलियम्स, सू रेडफर्न, क्लेयर पोलोसेक, लॉरेन एजेनबेग, किम कॉटन, वृंदा राठी, एन जननी, केंडेस ला बोर्डे, सारा दंबनेवाना, शथीरा जाकीर जेसी, केरिन क्लास्टे, निमाली परेरा, एलोइस शेरीडन, गायत्री वेणुगोपालन

आगामी आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेला येत्या ३० सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आली आहे. तर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी स्म्रिती मंधानाच्या हाती सोपवण्यात आली आहे. भारतीय संघ या स्पर्धेत दमदार सुरूवात करून जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याच्या प्रयत्नात असणार आहे. भारतीय संघाला आजवर एकदाही वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. त्यामुळे भारतात खेळताना भारतीय संघ ही ट्रॉफी उंचावण्यासाठी मैदानात उतरणार आहे.