बतुमी (जॉर्जिया) : भारताच्या दिव्या देशमुख, कोनेरू हम्पी, हरिका द्रोणवल्ली आणि आर. वैशाली यांनी ‘फिडे’ महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.
नागपूरच्या दिव्याने दुसऱ्या मानांकित चीनच्या झु जिनेरला १.५-०.५ असे उपउपांत्यपूर्व फेरीच्या टायब्रेकरमध्ये नमविले. अनुभवी हम्पीने स्वित्झर्लंडच्या अॅलेक्झांड्रा कोस्टेनियुकला याच फरकाने नमविले. हम्पीसमोर उपांत्यपूर्व फेरीत आता चीनच्या युक्सिन सोंगचे आव्हान असणार आहे.
हरिकाला रशियाच्या कॅटरिना लायनोविरुद्ध रॅपिड टायब्रेकचा पहिला डाव गमवावा लागला. मात्र, हरिकाने पुनरागमन करताना दुसरा डाव जिंकला. यानंतर लढत १०+१०च्या जलद (रॅपिड) टायब्रेकरमध्ये गेली. यामध्ये हरिकाने काळ्या मोहऱ्यांसह पहिला डाव बरोबरीत सोडवला. मग, पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना तिने दुसऱ्या डावात लायनोला नमवित पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले. हरिकासमोर उपांत्यपूर्व फेरीत दिव्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे दोन्ही भारतीय बुद्धिबळपटूंमध्ये चुरस पहायला मिळेल.
आर. वैशालीने १५+१० टायब्रेकरसह १०+१०च्या जलद टायब्रेकरमध्ये कझाकिस्तानच्या मेरूएर्ट कमलिदेनोव्हा बरोबरीची नोंद केली. यानंतर डाव अतिजलद (ब्लिट्झ) टायब्रेकरमध्ये गेला. यामध्ये प्रत्येक खेळाडूला पाच मिनिटांसह प्रत्येक डावातील चालींवर तीन सेकंद (इंक्रिमेंट) म्हणून मिळतात. वैशालीने पहिला डाव काळ्या मोहऱ्यांसह बरोबरीत सोडवला. मात्र, दुसऱ्या डावात तिने मेरूएर्टला नमवित पुढच्या फेरीत आगेकूच केली. वैशालीसमोर चीनच्या टॅन झोंगयिचे आव्हान असणार आहे. विश्वचषकातून ‘फिडे’ महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेसाठी तीन खेळाडूंना पात्रता मिळणार आहे. ही स्पर्धा २०२६च्या पहिल्या टप्प्यात पार पडेल.