Amanjot Kaur Catch of Laura Wolvaardt Video: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक फायनलमध्ये अमनजोत कौरने कमालीचा झेल टिपत सर्वांची मनं जिंकली आहेत. भारतीय संघाने फायनल सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. पण संघाची कर्णधार लॉरा वूल्व्हडार्ट हिने शतक करत एका टोकाला संघाचा डाव सावरला होता, पण अमनजोतने तिला बाद करण्यासाठी उत्कृष्ट झेल टिपला.
१९८३ च्या विश्वचषकातील झेल, टी-२० विश्वचषक २०२४ मधील सूर्यकुमार यादवचा झेल व आता महिला वनडे विश्वचषक २०२५ मधील अमनजोत कौरचा झेल तितकाच महत्त्वाचा ठरला. अमनजोत कौरच्या एका झेलने सामन्याचा रोख बदलला. झेल टिपताना ती गडबडली पण तिसऱ्या प्रयत्नात तिने कमालीचा झेल टिपला.
भारताची अष्टपैलू खेळाडू अमनजोत कौरने दक्षिण आफ्रिकेची कर्णधार आणि स्पर्धेतील सर्वात प्रभावी फलंदाज लॉरा वुल्व्हार्डला झेलबाद केलं. जिने उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट खेळी करत द. आफ्रिकेला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. उपांत्य फेरीत शतक झळकावणाऱ्या वुल्व्हार्डने अंतिम फेरीतही शतक झळकावलं आणि संघासाठी मैदानावर तळ ठोकून उभी होती. आता, जर भारताला जर जेतेपद नावे करायचं होतं तर वुल्व्हार्डला बाद करणं आवश्यक होतं.
अमनजोत कौरने लॉरा वुल्व्हार्डला असं केलं झेलबाद
एकीकडे, वुल्व्हार्ड आपल्या संघाला विजयाकडे नेण्यासाठी दृढनिश्चयी होती. दुसरीकडे, भारतीय संघ तिला बाद करण्याचा मार्ग शोधत होता. अखेर, दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या ४२ व्या षटकात ती संधी चालून आली. दीप्ती शर्माच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वुल्व्हार्डने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण हा शॉट मिस टाईम झाला आणि भारतासाठी विकेटची मोठी संधी आली.
चेंडू हवेत जाताच, अमनजोत कौर डावीकडे धावू लागली. तिने चेंडूच्या रेषेत येऊन तो पकडला. पण चेंडू अमनजोतच्या हातातून एकदा नाही तर दोनदा निसटला. पण चेंडू जमिनीवर पडण्यापूर्वीच तिने तिसऱ्या प्रयत्नात टिपला. या झेलमुळे १०१ धावांवर फलंदाजी करणाऱ्या लॉरा वुल्व्हार्डला झेलबाद होत माघारी परतावं लागलं. भारतीय महिला क्रिकेट संघाचा विश्वचषक जिंकण्याचा मार्ग सोपा झाला.
२०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात अमनजोत कौरचा झेल १९८३ च्या पुरुष एकदिवसीय विश्वचषकात कपिल देवने विव्ह रिचर्ड्सचा घेतलेला झेल आणि २०२४ च्या पुरुष टी२० विश्वचषकात सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा घेतलेला झेल यासारखाच होता. कपिल देव यांच्या झेलने पुरुषांच्या एकदिवसीय विश्वचषकात भारताची विजेतेपदाची प्रतीक्षा संपुष्टात आली. सूर्यकुमार यादवच्या झेलने भारताची आयसीसी ट्रॉफी जिंकण्यापासूनची ११ वर्षांची प्रतिक्षा संपली.
आता अमनजोत कौरच्या या झेलने भारतीय महिला संघाची विश्वचषक जेतेपदाची प्रतिक्षा संपली. अमनजोत कौरने तो झेल टिपताच ती मैदानावर झोपली आणि सुटकेचा नि:श्वास टाकला.
