* सॅव्हियो अ. भा. बास्केटबॉल स्पर्धा

अमेरिकेचा स्पोर्ट्सपॉवर संघ आणि तामिळनाडू यांच्यात रोमहर्षक सामन्याची पर्वणी चाहत्यांना अनुभवता आली. सॅव्हियो बास्केटबॉल स्पर्धेत स्पोर्ट्सपॉवर संघाने तामिळनाडूवर ८२-७१ असा विजय मिळवला असला तरी पहिल्या दोन फेऱ्या जिंकून तामिळनाडूने चांगलीच लढत दिली. दोन फेऱ्यांनंतर दोन गुणांनी पिछाडीवर पडलेल्या स्पोर्ट्सपॉवर संघाने तिसऱ्या फेरीत सुरेख खेळ करून ६६-५९ अशी आघाडी घेतली. चौथ्या फेरीत ७३-७१ अशी स्थिती असताना अखेरच्या दोन मिनिटांत ९ गुणांची कमाई करून स्पोर्ट्सपॉवरने हा सामना जिंकला. अमेरिकन संघातर्फे पॉल ग्रॅन्टने २३ तर टेरेन्स थॉमसने २१ गुण कमविले. तामिळनाडूतर्फे रिकिन पेठाण (२०) व सी. व्ही. दिनेश (१४) यांनी चांगली लढत दिली.