आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता बॉक्सर अमित पांघल आणि २०१७ चा कांस्यविजेता गौरव बिधुरी यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय बॉक्सिंग महासंघाकडून अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

अमित पांघलने जकार्तात झालेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत ४९ किलो वजनी गटातत उझबेकिस्तानचा ऑलिम्पिक पदकविजेत्या हसनबॉय डुसमॅटोव्हला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळेच राजीव गांधी खेलरत्ननंतरचा क्रीडा क्षेत्रातील दुसरा सर्वोच्च सन्मान समजल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्कारासाठी अमितला नामांकन देण्यात आले आहे. अमितची यापूर्वी २०१२ साली बॉक्सिंग महासंघाकडून अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. मात्र, एका उत्तेजक चाचणीत तो दोषी आढळल्याने त्याला एक वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे त्या वेळी त्याला नामांकिन मिळूनदेखील अर्जुन पुरस्कार मिळू शकला नव्हता. त्या वेळी कांजिण्या झाल्याने त्यावर घेतलेल्या औषधात तो प्रतिबंधित घटक होता, असे अमितकडून सांगण्यात आले होते.

दरम्यान, गौरव बिधुरीचे नावदेखील अर्जुनसाठी दुसऱ्यांदा नामांकित करण्यात आले आहे. त्याने हॅम्बुर्गला झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावण्याची कामगिरी केली होती. अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीत सोनिया लाठेर आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यविजेती पिंकी राणी यांचा समावेश होता, मात्र भारतीय बॉक्सिंग महासंघाने त्यांची शिफारस केली नाही. महिला संघाच्या सहप्रशिक्षक संध्या गुरुंग आणि मुख्य प्रशिक्षक शिव सिंग यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.