वृत्तसंस्था, ओस्लो : विश्वातील अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन आणि माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद हे नामांकित खेळाडू १०व्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. पाच वेळा विश्वविजेत्या मॅग्नसने या स्पर्धेच्या गेल्या तीन पर्वाचे जेतेपद पटकावले आहे. यंदाही या स्पर्धेच्या जेतेपदासाठी त्यालाच प्रमुख दावेदार मानले जात आहे. मात्र, त्याला अन्य नऊ बुद्धिबळपटू आव्हान देण्याचा प्रयत्न करतील. यामध्ये आनंदसह वेस्ली सो, वेसेलिन तोपालोव्ह, मॅक्सिम व्हॅचिर-लग्रेव्ह, शख्रियार मामेदेरोव्ह, तैमोर रॅजाबोव्ह आणि आर्यन तारी यांसारख्या जागतिक स्पर्धेतील माजी विजेत्या खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या केवळ अनिश गिरी आणि हाओ वांग या दोनच खेळाडूंच्या नावे जागतिक जेतेपद नाही.
या स्पर्धेत सर्व खेळाडू एकमेकांविरुद्ध साखळी सामने खेळणार आहेत. मानांकनासाठीचा अतिजलद (ब्लिड्झ) डाव मंगळवारी झाला. बुधवारपासून या स्पर्धेच्या मुख्य फेरीला सुरुवात होईल. मॅग्नस आणि आनंद यांच्यातील सामना हे या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असेल. हे दोन दिग्गज खेळाडू २०१३ आणि २०१४च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत समोरासमोर आले होते. दोन्ही वेळा मॅग्नसला जेतेपद पटकावण्यात यश आले होते. मात्र, नॉर्वे स्पर्धेत आनंदचा दमदार कामगिरीचा प्रयत्न असेल.