जगज्जेत्या विश्वनाथन आनंदला झुरिच बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पध्रेच्या चौथ्या फेरीत इटलीचा युवा बुद्धिबळपटू फॅबियानो करूआना याने आनंदचा पराभव केला. पहिल्या तीन सामन्यांत बरोबरीवर समाधान मानल्यानंतर आनंदच्या पदरी हा पराभव पडला. संयुक्तरीत्या अव्वल स्थानावरून आता आनंद अखेरच्या स्थानावर फेकला गेला आहे. चार स्पर्धकांचा समावेश असलेल्या आणि राऊंड रॉबिन पद्धतीने चाललेल्या या स्पध्रेतील अन्य सामन्यात रशियाच्या व्लादिमिर क्रामनिकने इस्रायलच्या बोरिस गेलफंडला बरोबरीत रोखले. या स्पध्रेच्या दोन फेऱ्या अद्याप बाकी असून, करूआना याने २.५ गुणांसह एकटय़ाने आघाडी घेतली आहे. तथापि, क्रामनिक आणि गेलफंड संयुक्तपणे २ गुणांवर आहे, तर आनंदच्या खात्यावर १.५ गुण जमा आहेत. अखेरच्या सामन्यात आनंद पांढऱ्या मोहऱ्यांनिशी क्रामनिकशी सामना करणार आहे. याच लढतीवर आनंदचे भवितव्य अवलंबून आहे. नुकत्याच झालेल्या ग्रेंके बुद्धिबळ स्पध्रेत आनंदपाठोपाठ करूआनाने उपविजेतेपद मिळवले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand shocked by caruana n the fourth round of zurich chess challenge
First published on: 01-03-2013 at 12:03 IST