Anaya Bangar First Time Tied Rakhi to Brother: आज सगळीकडेच बहिणी-भावांच्या अतूट बंधनाचा सण रक्षाबंधन साजरा केला जात आहे. या खास क्षणी अनाया बांगर हिने पहिल्यांदाच आपल्या भावाला राखी बांधली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनया बांगर हिने लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर धाकट्या भावाला राखी बांधली. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
अनाया बांगर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा मोठा विषय ठरली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक राहिलेल्या संजय बांगर यांची ती मुलगी आहे. अनाया बांगर हिचं पूर्वीचं नाव आर्यन बांगर असं होतं. अनायाने लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर आपलं नाव बदललं आहे.
अनाया बांगरने पहिल्यांदाच भावाला बांधली राखी
अनायाने यानंतर पहिल्यांदाच तिचा धाकटा भाऊ अथर्व बांगरला राखी बांधली. अनायाने तिच्या भावाला राखी बांधतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्याची सध्या चर्चा सुरू आहे. अनायाने राखी बांधतानाचे गोड फोटो तर शेअर केले आहेत. याचबरोबर भावा-बहिणीचं नातं सांगणारं छानसं कॅप्शनदेखील दिलं आहे.
लिंगबदलानंतरचा प्रवास सोशल मीडियावर केला शेअर
अनाया बांगरने तिच्या लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर आयुष्यातील अनेक पैलू सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिला केवळ एक क्रिकेटपटू म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची नाही तर तिच्या धाडसी आणि प्रेरणादायी प्रवासातून लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. अनायाने पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितलं की तिच्या भावाने अथर्व बांगरने तिचा बहिण म्हणून स्वीकार केला आहे आणि जेव्हा त्या या बदलाच्या काळातून जात होती. तेव्हा तिच्या भावाने खंबीर साथ दिली.
अनायाला लिंगबदल केल्यानंतर सोशल मीडियावर अनेक वाईट अनुभवांनाही सामोरं जावं लागलं. लोक सातत्याने तिच्या पोस्टवर नकारात्मक कमेंट्स करत आहेत. पण तरीही न डगमगता अनाया आपला हा प्रवास टप्प्याटप्प्याने सोशल मीडियावर शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वी तिने सर्फराझ खान आणि त्याच्या कुटुंबाची देखील भेट घेतली होती. याशिवाय अनाया क्रिकेटच्या सरावाचे व्हीडिओदेखील शेअर करत असते.