मँचेस्टर युनायटेडचा विंगर अँजेल डी मारियाने पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) क्लबसोबत चार वर्षांचा करार केला असून फ्रान्स लीगमधील तो दुसरा महागडा खेळाडू ठरला आहे. खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार दोहा येथे वैद्यकीय तपासणीनंतर या आठवडय़ाच्या अखेरीस मारिया पॅरिससह करार करणार आहे.
२०१४-१५च्या सत्रानंतर युनायटेडने मारियाला ६९ दशलक्ष अमेरिकन डॉलर किमतीत संघातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला. पीएसजीने त्याला खरेदी केले. त्यामुळे मारिया पीएसली क्लबमध्ये आता उरुग्वेचा स्ट्रायकर एडिन्सन कव्हानी याच्यासह खेळताना दिसणार आहे.
रिअल माद्रिदचा माजी मध्यरक्षक मारियाला युनायटेडने गतसत्रात ९९ दशलक्ष अमेरिकन डॉलर किमतीत संघात सामील करून घेतले होते.
त्या सत्रात ब्रिटिश फुटबॉल इतिहासातील हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. इंग्लिश प्रीमिअर लीगच्या गतसत्रात मारियाने दणक्यात सुरुवात केली, परंतु त्याला सातत्य राखण्यात अपयश आले.
पीएसजी क्लबसोबत झालेल्या करारामुळे मारियाला अर्जेटिनाचे सहकारी झेव्हीएर पॅस्टोर आणि एजेक्वीएल लॅव्हेज्जी यांच्यासोबत खेळता येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या कोपा अमेरिका स्पध्रेत उपविजेतेपद पटकावणाऱ्या अर्जेटिना संघात या तिन्ही खेळाडूंचा समावेश होता. त्यामुळे पीएसजीसाठी हा करार फायद्याचा ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पीएसजीने चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यांना गत दोन सत्रांत चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करता आलेला नाही. पीएसजीचे प्रशिक्षक लॉरेंट ब्लॅन्स यांना मध्यरक्षक, बचावपटू किंवा आक्रमकपटू असे अनेक पर्याय मारियाच्या नियुक्तीमुळे मिळाले आहेत. त्यामुळे पीएसजीच्या आशाही उंचावल्या आहेत.
२०१४ च्या चॅम्पियन्स लीग स्पध्रेच्या अंतिम फेरीत सामनावीराच्या किताबाने गौरविलेल्या मारियाने युनायटेडकडून २७ सामन्यांत केवळ तीन गोल केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Angel di maria accepts 4 year deal with psg
First published on: 05-08-2015 at 03:15 IST