भारतीय खुली बॅडमिंटन स्पर्धा : अनुप, सायली मुख्य फेरीत

माजी राष्ट्रीय विजेते अनुप श्रीधर, सायली गोखले यांच्यासह मुद्रा धाईंजे, श्रुती मुंदडा, अजय कुमार आणि श्रेयंश जैस्वाल यांनी भारत खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत मुख्य फेरीत आगेकूच केली.

माजी राष्ट्रीय विजेते अनुप श्रीधर, सायली गोखले यांच्यासह मुद्रा धाईंजे, श्रुती मुंदडा, अजय कुमार आणि श्रेयंश जैस्वाल यांनी भारत खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत मुख्य फेरीत आगेकूच केली. अनुभवी अनुपने चेतन आनंदला २१-१४, २१-१६ असे नमवले. स्मॅशिंगच्या बहारदार फटक्यांचा उपयोग केला. तसेच त्याने कॉर्नरजवळ प्लेसिंगचाही कल्पकतेने वापर केला.श्रेयंश जैस्वाल याने आव्हान राखताना शुभंकर डे याला पराभूत करीत मुख्य फेरीकडे वाटचाल केली. अटीतटीने झालेला हा सामना त्याने २१-१९, १४-२१, २१-८ असा जिंकला. बी.अजयकुमार याने अपराजित्व राखताना अरविंद भट याला २२-२०, २३-२१ असे संघर्षपूर्ण लढतीनंतर हरविले. सायलीने पहिल्या लढतीत नेहा पंडितवर २१-१४, २१-१८ असा विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत तिने ज्योती नेशिअरचा २१-१२, २१-५ असा धुव्वा उडवला. मुद्राने पात्रता फेरीच्या पहिल्या लढतीत भारताचीच जॅकलीन रोझी हिच्यावर निसटता विजय मिळविला. चुरशीने झालेला हा सामना तिने १९-२१, २१-१९, २१-११ असा जिंकला. पाठोपाठ दुसऱ्या सामन्यात तिने महाराष्ट्राचीच खेळाडू धन्या नायर हिचे आव्हान २१-१५, २१-१४ असे संपुष्टात आणले. श्रुतीने पहिल्या लढतीत यामिनी शर्मा हिच्याविरुद्ध पहिल्या गेममध्ये १५-४ अशी आघाडी घेतली असताना यामिनी हिने दुखापतीमुळे सामना सोडून दिला. श्रुती हिने पात्रता फेरीतील दुसऱ्या सामन्यात संकिर्ती छाब्रा हिचा २१-११, २१-६ असा सहज पराभव केला. तिने ड्रॉपशॉट्सचा सुरेख खेळ केला तसेच तिने सव्‍‌र्हिसवरही चांगले नियंत्रण राखले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Anup sridhar sayali qualifies for india open super series main draw