महान फुटबॉलपटू तसेच अर्जेटिनाच्या १९८६च्या फिफा विश्वचषक जेतेपदाचे शिल्पकार दिएगो मॅराडोना यांचे वयाच्या ६०व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. मेंदूवर झालेल्या शस्त्रक्रियेतून सावरत असतानाच हृदयविकाराच्या झटका बसल्याने मॅराडोना यांचे निधन झाले आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. घरी उपचार घेत असतानाच, बुधवारी त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका बसला. डॉक्टरांचे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मॅराडोना यांच्या निधनाच्या बातमीने बुधवारी सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. अर्जेटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बेटरे फर्नाडेझ यांनी तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला.

आपल्या ‘हँड ऑफ गॉड’ गोलमुळे मॅराडोना यांनी अर्जेटिनाला १९८६मध्ये फिफा विश्वचषकाचे जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावली. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणल्या जाणाऱ्या मॅराडोना यांची कारकीर्द यशाइतकीच वादविवादांनीही गाजली. आपल्या गोल करण्याच्या क्षमतेमुळे तसेच अभूतपूर्ण कौशल्यामुळे त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. पण अंमली पदार्थाच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्या कारकीर्दीला अनेक वेळा वादाचे गालबोटही लागले.

लीग फुटबॉलमध्ये इटलीच्या नापोली संघाकडून खेळताना मॅराडोना यांनी घवघवीत यश मिळवले. १९८७ आणि १९९०मध्ये सेरी-ए फुटबॉल स्पर्धेचे तसेच १९८७मध्ये इटालियन चषकाचे आणि १९९१मध्ये यूएफा चषकाचे विजेतेपद मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. याच वर्षी नशेच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्यावर उत्तेजक सेवनप्रकरणी १५ वर्षांची बंदी घालण्यात आली. १९९४मध्ये उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे अमेरिकेत झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी त्यांची अर्जेटिना संघातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर १९९७मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. नापोलीसह त्यांना बोका ज्युनियर्स, बार्सिलोना, सेव्हिया या संघांचेही प्रतिनिधित्व केले आहे. २००८ ते २०१० या कालावधीत अर्जेटिना संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या मॅराडोना यांनी अल-वासल, डिपोर्टिव्हो रिएस्ट्रा, फुजायरा, डोराडोस डे सिनालोआ, जिम्नॅसिया डेला प्लाटा या संघांचे प्रशिक्षकपद भूषवले आहे.

१९९९ आणि २०००मध्ये त्यांना हृदयविकाराच्या समस्येमुळे अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागले. अंमली पदार्थाच्या सेवनामुळे त्यांना २००४मध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका बसला होता. दोन शस्त्रक्रियांनंतर ते सावरले होते. गेल्या महिन्यात मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

मॅराडोना आणि वाद

मॅराडोना हा सर्वकालीन महान फुटबॉलपटूंमध्ये गणला जातो. अर्जेटिनाला १९८६ मध्ये विश्वचषक जिंकून देण्यात मॅराडोनाचे योगदान होते. मात्र मॅराडोना हा तितकाच वादग्रस्त, विक्षिप्त स्वभावासाठीही चर्चेत राहिला. वादग्रस्त आणि चर्चेत राहिलेले त्याचे किस्से पुढीलप्रमाणे –

मॅराडोनाचा ‘हँड ऑफ गॉड’ गोल

मॅराडोनाचा १९८६च्या विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडविरुद्धचा ‘हँड ऑफ गॉड’ गोल खऱ्या अर्थाने क्रीडारसिकांच्या भुवया उंचावणारा ठरला.  त्याने हाताने फुटबॉल गोलजाळ्यापर्यंत पोहोचवत गोल लगावला. या गोलला वादग्रस्त गोलही म्हटले जाते आणि सर्वश्रेष्ठ गोलही म्हणण्यात येते. त्याचा हा गोल आजही फुटबॉल जगतात कायम स्मरणात आहे.

१९९४ विश्वचषकातून बाहेर

१९८६मध्ये अर्जेटिनाला वयाच्या २५व्या वर्षी विश्वचषक जिंकून देणाऱ्या मॅराडोनासाठी १९९४ चा विश्वचषक हा तितकाच दु:खदायी ठरला. त्या विश्वचषकात उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने मॅराडोनाला स्पर्धेबाहेर काढण्यात आले.

पत्रकाराला थप्पड

प्रेयसीसोबत एकदा रस्त्यातून हातात हात घालून फिरणाऱ्या मॅराडोनाचे छायाचित्र एका पत्रकाराने काढण्याचा प्रयत्न केला. मात्र भडक स्वभावाच्या मॅराडोनाने त्या पत्रकाराच्या थोबाडीत मारली.

विक्षिप्त स्वभाव

मॅराडोना हा कधी विक्षिप्त स्वभावाप्रमाणे सध्याचा सर्वोत्तम फुटबॉलपटू लिओनेल मेसीचा पाठराखण करायचा किंवा त्याच्यावर टीका करायचा. एका कार्यक्रमात महान फुटबॉलपटू पेले यांच्याशी बोलताना मॅराडोनाने मेसीकडे चांगले व्यक्तिमत्व नसल्याची बोचरी टीका केली होती.

मेसीवर टीका

अर्जेटिनाचे २०१० विश्वचषकात प्रशिक्षक भूषवणाऱ्या मॅराडोनाने त्याच्या संघाच्या खेळाडूंवरही टीका केली होती. २०१६ कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावले नाहीत तर पुन्हा अर्जेटिनात येऊ नका, असे वादग्रस्त विधान मॅराडोनाने मेसी आणि संघातील खेळाडूंना उद्देशून केले होते.

अतिशय दु:खद बातमी. मी एक चांगला मित्र आणि जगाने एक महान फुटबॉलपटू गमावला आहे. मॅराडोना यांच्याबद्दल बरेच काही सांगण्यासारखे आहे. पण सद्यस्थितीत हे दु:ख पचवण्याची क्षमता त्यांच्या कुटुंबियांना देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एके दिवशी आम्ही आकाशात दोघेही फुटबॉल खेळताना दिसू, हीच अपेक्षा आहे.

– पेले, ब्राझीलचे महान फुटबॉलपटू

महान फुटबॉलपटूला श्रद्धांजली. फुटबॉलच्या इतिहासात तुम्ही कायम स्मरणात राहाल. जगाला तुम्ही अविस्मरणीय असा फुटबॉलचा आनंद दिलात, त्याबद्दल धन्यवाद.

-किलियन एम्बाप्पे, फ्रान्सचा फुटबॉलपटू

माझा हिरो आता राहिला नाही. मी मॅराडोनाला खेळताना पाहून फुटबॉल बघायला सुरुवात केली. मॅराडोना तुझ्या आत्म्याला शांती मिळो.

– सौरव गांगुली, भारताचा माजी क्रिकेट कर्णधार

फुटबॉल आणि क्रीडा जगताने महान खेळाडूला मॅराडोनाच्या रूपाने गमावले आहे. मॅराडोनाची उणीव जगाला कायम जाणवेल.

– सचिन तेंडुलकर, महान क्रिकेटपटू

मॅराडोना तुमच्या आत्म्याला शांती मिळू दे. तुमची उणीव संपूर्ण जगतात कायम राहील.

– युसेन बोल्ट, जमैकाचा धावपटू

मॅराडोना हे फुटबॉल मैदानावरील जादूगार होते. त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. मॅराडोना हे संपूर्ण जगाच्या स्मरणात कायमचे असतील. मॅराडोना खूप लवकर आम्हाला सोडून गेले.

– ख्रिस्तियानो रोनाल्डो, पोर्तुगालचा  फु टबॉलपटू

मॅराडोना तुमची नेहमीच आठवण येईल. हा फुटबॉल जगतासाठी आणि माझ्यासाठी दु:खाचा दिवस आहे.

– नेयमार , ब्राझीलचा फुटबॉलपटू