जगभरातल्या फुटबॉलरसिकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरलेल्या बहुचर्चित चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या जेतेपदावर बायर्न म्युनिच क्लबने मोहोर उमटवली. चुरशीच्या लढतीत बायर्न म्युनिचने जर्मनीच्याच बोरुसिया डॉर्टमंडला २-१ फरकाने नमवले. सामना संपायला अवघी काही मिनिटे बाकी असताना अर्जेन रॉबीनने शानदार गोल करत बायर्नला थरारक विजय मिळवून दिला.
निर्धारित वेळेच्या आधी दोन्ही संघांची १-१ अशी बरोबरी होती. सामना अतिरिक्त वेळेत जाण्याची शक्यता होती. त्याचवेळी रॉबीनने फ्रँक रिबरीच्या पासचा सुरेख उपयोग केला. बोरुसियाच्या मॅट्स हमेल्सचा बचाव मोडून काढत तसेच गोलरक्षक रोमन वेइडेनफेलरला भेदत रॉबीनने चेंडूला गोलपोस्टची दिशा दाखवली आणि लंडनच्या वेम्बले मैदानावर उपस्थित बायर्न म्युनिचच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. २०१० आणि २०१२मध्ये बायर्नला अंतिम फेरीत निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र यंदा कागदावरील योजना प्रत्यक्षात अचूकपणे अमलात आणत बायर्नने पाचव्या चॅम्पियन्स लीग जेतेपदाची नोंद केली.
अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या जर्मन क्लबमधील अंतिम लढतीत रॉबीनने बायर्नच्या विजयाचा पाया रचला. रॉबेनने दिलेल्या पासचा उपयोग करत मारिओ मँडझुकिकने बायर्नचे खाते उघडले. मात्र ६८व्या मिनिटाला डॉर्टमंडतर्फे इल्के गुंडोगनने गोल करत बरोबरी केली. दोन्ही संघांनी बचाव अभेद्य केल्याने बरोबरीची स्थिती कायम राहिली. निर्धारित वेळ जवळ समीप आली असताना रॉबीनने आपला सारा अनुभव पणाला लावत डॉर्टमंडच्या बचावपटूंचा चक्रव्यूह भेदला. निर्णायक गोलसह बायर्न म्युनिचने शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
दोन विविध संघांचे व्यवस्थापक म्हणून जेतेपद पटकावण्याचा अनोखा विक्रम बायर्नचे व्यवस्थापक ज्युप हेन्कीज यांच्या नावावर झाला. याआधी १९९८मध्ये हेन्कीज व्यवस्थापक असताना रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीग जेतेपदाची कमाई केली होती.
हा विजय साकारत बायर्नच्या खेळाडूंनी हेन्कीज यांना विजयी निरोप दिला. काही दिवसांतच हेन्कीज पदभार सोडणार असून, त्यांच्या जागी पेप गॉर्डिओला बायर्नच्या व्यवस्थापकपदी विराजमान होणार आहेत.