हांगझो : दोन्ही हात नसतानाही भारताच्या युवा शीतल देवी हिने तिरंदाजी प्रकारात पॅरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. एकाच स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवणारी शीतल पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. भारताची या स्पर्धेत आतापर्यंत ९९ पदके झाली आहेत. याच आठवडय़ात अंकुर धमाने एकाच स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवली होती.
भारताने शुक्रवारी सात सुवर्णपदकांसह १७ पदकांची कमाई केली. यामध्ये बॅडिमटनमधील ८ पदकांचा समावेश होता. स्पर्धेला एक दिवस बाकी असून, भारत २५ सुवर्ण, २९ रौप्य आणि ४५ कांस्यपदकांसह ९९ पदके मिळवून सहाव्या स्थानावर आहे. चीन सुवर्णपदकांच्या द्विशतकाच्या उंबरठय़ावर आहेत. चीनने आतापर्यंत १९६ सुवर्ण, १५९ रौप्य आणि ४५ कांस्यपदके मिळवली आहेत. एकूण पदकांच्या क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर असला तरी, सुवर्णपदकांची संख्या कमी असल्यामुळे भारताची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.
हेही वाचा >>> Pak vs SA: दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानवर एका विकेटने थरारक विजय
तिरंदाजीत शीतलने कम्पाऊंड प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदकाची कमाई केली. शीतलने गुरुवारी मिश्र दुहेरीतही सुवर्णपदक जिंकले होते. जम्मू काश्मीरच्या १६ वर्षीय शीतलने महिलाच्या दुहेरीत रौप्यपदकही मिळवले आहे. दोन्ही हात नसताना शीतल पायाने आपले लक्ष्य भेदते. अंतिम फेरीत शीतलने सिंगापूरच्या अलिम नूर स्याहिदाहचा १४४-१४२ असा पराभव केला. बॅडिमटनमध्ये प्रमोद भगतने आपलाच सहकारी नितेश कुमारचा २२-२०, २१-१९ असा पराभव करून ‘एसएल-३’ प्रकारात सुवर्णपदक पटकावले. दुहेरीत नितेश-तरुणने सुवर्णपदक मिळवले. महिला विभागात थुलासिमथी मुरुगेसन हिने चीनच्या यांग क्वीउशियाचा २१-१९, २१-१९ असा पराभव करून सुवर्णपदकाची कमाई केली. पॅरालिम्पिक विजेता कृष्णा नगरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुण्याच्या सुयश जाधवने जलतरणातील पहिले पदक भारताला मिळवून दिले. तो ‘एस-७’ प्रकारात पुरुषांच्या ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्यपदकाचा मानकरी ठरला.