कार्लसनशी बरोबरीनंतर आनंद नवव्या स्थानी
भारताच्या विश्वनाथन आनंदने शेवटच्या फेरीत विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखले आणि सिंक्वेफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेत आठवे स्थान पटकावले. अर्मेनियाच्या लिव्हॉन आरोनियनने विजेतेपदावर मोहर नोंदविली.
आरोनियनने शेवटच्या फेरीत व्हॅसेलीन तोपालोव्ह (बल्गेरिया) याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारली. नऊ फे ऱ्यांमध्ये त्याने सहा गुण मिळविले. अनिष गिरी (नेदरलँड्स), कार्लसन (नॉर्वे), मॅक्झिम व्हॅचिअर-लॅग्रेव्ह (फ्रान्स) व हिकारू नाकामुरा (अमेरिका) यांचे प्रत्येकी पाच गुण झाले. प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे दोन ते पाच क्रमांक देण्यात आले. तोपालोव्ह व रशियाचा अ‍ॅलेक्झांडर ग्रिसचुक यांचे प्रत्येकी साडेचार गुण झाले. प्रगत गुणांच्या आधारे त्यांनी अनुक्रमे सहावे व सातवे स्थान घेतले. आनंद व अमेरिकेचा फॅबिआनो कारुआना यांचे प्रत्येकी साडेतीन गुण झाले. त्यांना अनुक्रमे आठवे व नववे स्थान मिळाले. अमेरिकेच्याच वेस्ली सो याला शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याचे तीन गुण झाले.
आनंद व कार्लसन यांच्यातील लढतीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे मोहरे घेतले. वजिरा-वजिरी नंतर दोन्ही खेळाडूंनी आक्रमणासाठी व्यूहरचना करण्याचा प्रयत्न केला, मात्र ३६व्या चालीला दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली. त्या वेळी कार्लसनकडे एक जास्त प्यादे होते. परंतु आनंदने भक्कम बचाव केल्यामुळे विजय मिळवण्यासाठी अनावश्यक जोखीम घेण्याऐवजी कार्लसनने अर्धा गुण घेण्यास प्राधान्य दिले.
गिरी याने शेवटच्या फेरीत लॅग्रेव्हला बरोबरीत रोखले तर नाकामुराने ग्रिसचुकवर उल्लेखनीय विजय मिळवला. वेस्लीने कारुआनाला बरोबरीत रोखून अनपेक्षित निकाल नोंदवला.