धनंजय रिसोडकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र कुस्ती दंगलचे पहिले पर्व आता अखेरच्या टप्प्याकडे सरकले असून चुरस तीव्र झाली आहे. त्यामुळे साहजिकच या लीगच्या निकालाची उत्कंठा अधिकच ताणली गेली आहे. या लीगमुळे कुस्तीला पुन्हा चांगले दिवस येण्याची आशा करता येऊ शकेल. मात्र सादरीकरण आणि आयोजनातील काही त्रुटींमुळे महाराष्ट्राच्या कुस्तीतील सर्वोत्तम गुणवत्ता समोर आणण्याचा हा प्रयत्न काहीसा थिटाच पडला आहे. पुरुषांच्या बऱ्याच लढतींमध्ये चुरशीचा अभाव आणि महिला कुस्तीत तर वजनी गटाच्या अपरिहार्यतेमुळे महाराष्ट्राच्या मुलींवर अन्याय झाल्याचे दिसून येते.

कुस्ती दंगलच्या साखळी फेरीतून ‘कुस्तीची पंढरी’ मानला गेलेला कोल्हापूरचा संघ पिछाडीवर पडलाय, तर स्वतंत्र भारताला ऑलिम्पिकचे पहिले पदक मिळवून देणाऱ्या मल्ल खाशाबा जाधव यांचा सातारा जिल्हा अव्वल स्थानी आहे. या स्पर्धेचा अंतिम निकाल काहीही लागला तरी त्यातील थरार हा निश्चितच कुस्तीचा रस वाढवणारा ठरणार आहे. महिन्याच्या प्रारंभी सुरू झालेल्या या कुस्ती दंगलने महाराष्ट्राच्या कुस्तीला एक नवीन उभारी देण्याचे काम केले आहे. अनेक घरांमधील मंडळी अन्य करमणुकीच्या कार्यक्रमांऐवजी कुस्ती दंगलच्या प्रेमात पडली आहेत. काही घरांमधील महिला त्यांच्या मालिकांकडे पाठ वळवून आणि विशेषत्वे बालकेदेखील ‘कार्टुन’ऐवजी कुस्तीचा प्रत्यक्ष थरार बघण्याचा आनंद लुटू लागल्याचे सकारात्मक चित्र आहे. तसेच या दंगलच्या निमित्ताने काही मल्ल, त्यांचे प्रशिक्षक, निवेदक यांना चांगले मानधन मिळू लागल्याने त्यांच्यासाठी ही एक अनोखी पर्वणी ठरली आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्य़ांमध्ये यामुळे सकारात्मक चित्र दिसू लागले आहे. काही आखाडय़ांच्या वस्तादांकडे आणि महानगरांमधील कुस्ती प्रशिक्षकांकडे पालक त्यांच्या मुला-मुलींना स्वत:च घेऊन येण्याचे प्रमाणदेखील महिनाभरात वाढू लागल्याचे चित्र निश्चितच समाधानकारक आहे. तसेच राहुल आवारे, विजय चौधरी, उत्कर्ष काळे, किरण भगत यांच्यासारख्या मल्लांसमवेत सेल्फी घेण्यासाठी उडणारी आबालवृद्धांची झुंबड आणि दिवसागणिक वाढत चाललेला त्यांचा प्रतिसाद हे कुस्तीचे नवीन ‘तारे’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे द्योतक आहे.

कुस्ती दंगलच्या या पहिल्या प्रयोगातून पडद्यावर झळकणाऱ्या काही बाबींचे समाधान असले तरी पडद्यामागील घटना घडामोडी तितक्याशा समाधानकारक नसल्याचे निदर्शनास येत आहे. स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात मुंबई अस्त्र संघाचे मालक राजेश डाके यांनी संघातील खेळाडू आणि तंत्रज्ञांप्रती असलेले आर्थिक दायित्व देण्यास असमर्थता दर्शवत सर्वात मोठा धक्का दिला आहे.

त्याशिवाय काही अनिष्ट बाबींवर जाणकार कुस्तीप्रेमी, प्रशिक्षक आणि प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कुस्ती रंगतदार होण्यासाठी त्याचे निवेदनदेखील तितकेच रोचक होणे अपेक्षित असते. मात्र जाणकार निवेदकांना अधिक वेळ देण्यापेक्षा काही वेळभरू आणि तथाकिथत लोकप्रिय कलाकार निवेदकांकडून केले जाणारे निवेदन हे कुस्तीच्या रोचकपणात भर घालण्याऐवजी केवळ मनोरंजनाचा आभास निर्माण करीत आहेत. त्याशिवाय जे मल्ल कुस्तीच्या बोलीतदेखील नव्हते, अशा मल्लांचा अचानकपणे संघात केलेला समावेश हा अनाकलनीय होता. काही प्रशिक्षकांकडून पंचांच्या निर्णयाला विनाकारण दिले जाणारे आव्हानदेखील कुस्ती सामन्यांमध्ये रसभंग करीत आहेत. या चुकीच्या आव्हानांबाबत भारतीय कुस्ती संघाकडून पाठविण्यात आलेले निरीक्षक अशोक कुमार यांनी संबंधित प्रशिक्षकांचे कान टोचूनदेखील फारसा फरक पडला नाही.

‘दंगल’ चित्रपटानंतर महाराष्ट्रातदेखील एकाहून एक सरस महिला मल्ल पुढे येत असून त्यांना संधी मिळण्यासाठी कुस्ती दंगलमध्ये पुरुष आणि महिलांच्या गटांचे प्रमाण ४-२ असे करणे आवश्यक आहे. महिला वजनी गटात ६० आणि त्याखालील असे दोन गट केल्यास राष्ट्रीय स्तरावर झळकणाऱ्या महाराष्ट्राच्या मुलींना खऱ्या अर्थाने चमकण्याची संधी मिळू शकेल. तसेच काही नामवंत मल्ल आणि जाणकारांच्या मतानुसार यंदाच्या दंगलमध्ये एकाच अकादमीतील मल्लांचा भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अन्य भागांतील आखाडय़ांच्या नामवंत मल्लांचा यंदाच्या पर्वात समावेश नसल्याची उणीव निश्चितच खटकणारी आहे.

dhananjay.risodkar@expressindia.com

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about maharashtra kushti dangal first season
First published on: 18-11-2018 at 01:39 IST