हं गेरीची राजधानी बुडापेस्ट या ऐतिहासिक शहरात भारतीय पुरुष (२१ गुण) आणि महिला संघांनी (१९ गुण) सुवर्णपदके पटकावून बुद्धिबळ या अस्सल भारतीय खेळाच्या जन्मदात्या भूमीला धन्य केले. पुरुष आणि महिला या दोन्ही भारतीय संघांनी निर्णायक लढतीत ३.५-०.५ असे एकतर्फी विजय मिळवले.

भारतीय झंझावातापुढे आतापर्यंत बुद्धिबळ जगतावर राज्य करणाऱ्या चीन आणि अमेरिकेचा निभावच लागला नाही. या दोन्ही संघांना भारताच्या तरुण संघांनी सहज पराभूत करून एकच खळबळ उडवून दिली होती. करोनाकाळात ‘ऑनलाइन’ स्पर्धेत भारतीय संघाकडून पराभूत झाल्यामुळे चिनी राज्यकर्त्यांनी भारतीय बुद्धिबळ संघ खेळत असेल तेथे आपल्या संघांना खेळायची बंदी केली होती. त्यामुळे त्यांचा महिला संघ २०२२ साली स्पेनमधील जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद सामन्यात, तसेच दोन्ही पुरुष आणि महिला संघ भारतातील चेन्नई येथे झालेल्या ऑलिम्पियाड स्पर्धेत खेळले नव्हते. आता चिनी राज्यकर्त्यांना आपल्या खेळाडूंना कुठे खेळवायचे तेच कळेनासे होईल.

हेही वाचा >>>बुमरा, पंतची लय महत्त्वाची; बॉर्डरगावस्कर मालिकेबाबत चॅपल यांचे विधान

रविवारी झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय पुरुष संघाचे आधारस्तंभ गुकेश आणि अर्जुन एरिगेसी यांनी ग्रँडमास्टर फेडोसीव्ह आणि ग्रँडमास्टर यान सुबेल यांना सहज पराभूत करून आपल्या संघाचे सुवर्णपदक निश्चित केले. दोघांनाही वैयक्तिक सुवर्णपदक मिळाले आणि भारताच्या बुद्धिबळ वैभवाची साक्ष जगाला मिळाली. चीनचा संघ अमेरिकेच्या बलाढ्य संघाकडून अखेरच्या फेरीत पराभूत झाला. त्यामुळे त्यांचे सुवर्णयशाचे स्वप्न भंगले.

भारतीय महिला संघाने अखेरच्या फेरीत कमाल केली. गेली २० वर्षे ऑलिम्पियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या द्रोणावल्ली हरिकाने आपली गेलेली लय परत मिळवताना अझरबैजानच्या गुनायला कठोर परिश्रम घेऊन पराभूत केले. दिव्या देशमुखने इंग्लिश ओपनिंगचा उपयोग करून गौहरला हरवले. वंतिका अग्रवालने एका सापळ्यात अडकवून खाणीमवर डाव उलटवला आणि भारताला ३.५-०.५ असा देदीप्यमान विजय मिळवून दिला.

हेही वाचा >>>ऑलिम्पियाड जेतेपदाला ऑलिम्पिक सुवर्णपदकाचेच तेज! ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांचे मत

महिलांमध्ये भारताशी बरोबरी करण्याचा कझाकस्तान प्रयत्न करत होते आणि त्यांनी अमेरिकेच्या महिला संघाविरुद्ध वरचष्मा मिळवला होता. तरीही अनुभवी अमेरिकन संघाने जोरदार लढा दिला. त्यामुळे ही लढत बरोबरीत सुटली आणि भारताचे जेतेपद पक्के झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे दोन्ही संघांत राज्याचे मोठे योगदान आहे. पुरुष संघात नाशिकच्या विदित गुजराथीने योग्य वेळी संघाला हात दिला. अमेरिकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात काळ्या मोहऱ्यांनी खेळताना त्याने अरोनियनसारख्या मातब्बर खेळाडूला बरोबरीत रोखून भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. महिलांमध्ये नागपूरची दिव्या देशमुख भारतीय संघाची आधारस्तंभ ठरली. तिला या ‘सोनेरी’ कामगिरीसाठी वैयक्तिक सुवर्णपदकही मिळाले. या दोघा ‘लोकसत्ता तरुण तेजांकितां’चा या ऐतिहासिक विजयात मोठा वाटा आहे. महिला संघाचा कर्णधारही पुणेकर ग्रँडमास्टर अभिजित कुंटे आहे. आता सर्वांचे लक्ष नोव्हेंबरमध्ये सिंगापूर येथे होणाऱ्या जगज्जेतेपदाच्या लढतीकडे लागले आहे. या लढतीत गुकेशने चीनच्या डिंग लिरेनविरुद्ध विजय मिळवला, तर भारताला सुवर्ण ‘हॅट्ट्रिक’ साजरी करता येईल.