आर्यन गोवीस (भारत) व प्लोब्रुंग प्लिपुच (थायलंड) यांनी गद्रे करंडक आंतरराष्ट्रीय कनिष्ठ मानांकन टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे मुले व मुलींच्या गटात विजेतेपद पटकाविले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या या स्पर्धेत आर्यन याने अंतिम लढतीत इंग्लंडच्या जॉन क्लार्क या अव्वल मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का दिला. त्याने हा सामना ७-६ (८-६), ६-३ असा जिंकला. आर्यन हा मुंबईतील रिजवी महाविद्यालयात अकरावी इयत्तेत शिकत असून तो पुण्यातील सोलारिस क्लब येथे आदित्य मडकईकर या खेळाडूच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
 मुलींच्या अंतिम लढतीत द्वितीय मानांकित प्लिपुच हिने आपल्या देशाची सहकारी व अग्रमानांकित खेळाडू तमाचान मुमकुंथोड हिच्यावर ७-५, ६-४ असा संघर्षपूर्ण विजय मिळविला.
मुलांच्या दुहेरीतही क्लार्क याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारताच्या वशिष्ठ चेरुकु व साहिल देशमुख यांनी क्लार्क व सीरियन खेळाडू करीम आलाफ यांचा ६-२, ६-३ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. मुलींच्या दुहेरीत भारताच्या झील देसाई हिने चीन तैपेईच्या हुआंग हसांग वेन हिच्या साथीत अजिंक्यपद मिळविले. त्यांनी जॉर्जिना अ‍ॅक्सोन (इंग्लंड) व वासंती शिंदे (भारत) यांचा ३-६, ६-३, १०-६ असा पराभव केला.
पारितोषिक वितरण समारंभ आदिवेनु मोटर्सचे सरव्यवस्थापक श्रीनिवास दांडेकर, राज्याचे क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल यांच्या हस्ते झाला. या वेळी राज्य टेनिस संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष भालचंद्र भागवत व सचिव सुंदर अय्यर उपस्थित होते.