विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा

बिगरमानांकित अ‍ॅलिसनचा पराक्रम; सेरेना, नदाल, जोकोव्हिच यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; हॅलेपकडून १५ वर्षीय गॉफची वाटचाल खंडित

महिलांच्या जागतिक टेनिस क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅश्ले बर्टीला सोमवारी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. अमेरिकेच्या बिगरमानांकित अ‍ॅलिसन रिस्केने बर्टीला नामोहरम करून महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

अनुभवी सेरेना विल्यम्स, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच यांनी उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश पक्का केला, तर १५ वर्षीय कोरी गॉफची स्वप्नवत वाटचाल सिमोना हॅलेपने खंडित केली.

अग्रमानांकित बर्टीने विम्बल्डनपूर्वी झालेल्या फ्रेंच टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळवून क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावला होता. मात्र सोमवारी २९ वर्षीय अ‍ॅलिसनपुढे तिची डाळ शिजली नाही. अ‍ॅलिसनने बर्टीचा ३-६, ६-२, ६-३ असा पराभव केला. अ‍ॅलिसनने एक तास आणि ३७ मिनिटांमध्ये हा सामना जिंकला.

दुसऱ्या उपउपांत्यपूर्व सामन्यात अमेरिकेच्या ११व्या मानांकित सेरेनाने ३०व्या मानांकित कार्ला सुआरेझचा ६-२, ६-२ असा धुव्वा उडवला. ३७ वर्षीय सेरेनाने १४व्यांदा विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली असून उपांत्यपूर्व सामन्यात तिच्यापुढे बर्टीला स्पर्धेबाहेर करणाऱ्या अ‍ॅलिसनचे आव्हान असणार आहे.

पहिल्या फेरीत पाच वेळच्या विम्बल्डन विजेत्या व्हीनस विल्यम्सला पराभूत करून सर्वाना आपली दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या अमेरिकेच्या गॉफला उपउपांत्यपूर्व फेरीचा अडथळा ओलांडण्यात अपयश आले. रोमानियाच्या सातव्या मानांकित हॅलेपने गॉफचा ६-३, ६-३ असा सहज पाडाव केला. याव्यतिरिक्त आठव्या मानांकित एलिना स्विटोलिनाने २४व्या मानांकित पेट्रा मॅट्रिकला ६-४, ६-२ अशी धूळ चारली. बाबरेरा स्टिरिकोव्हाने २१व्या मानांकित एलिस मर्टन्सला ४-६, ७-५, ६-२ असे नमवून उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला.

पुरुष एकेरीत स्पेनच्या तिसऱ्या मानांकित आणि यंदाच्या फ्रेंच स्पर्धेचा विजेता नदालने पोर्तुगालच्या ज्यो सौसावर ६-२, ६-२, ६-२ अशी मात केली. पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या सर्बियाच्या जोकोव्हिचने युगो ह्य़ुम्बर्टचा ६-३, ६-२, ६-३ असा पराभव करून सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद मिळवण्याच्या दिशेने कूच केली आहे. अमेरिकेच्या क्युरेने टेनिस सँडग्रीनला चार सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-४, ६-७ (७-९), ७-५, ७-६ (७-५) असे पराभूत केले.

३९ १९८०मध्ये म्हणजेच तब्बल ३९ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या ईव्होन कॉवले यांनी विम्बल्डन महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर एकाही ऑस्ट्रेलियन खेळाडूला असा पराक्रम करता आला नाही.

१अ‍ॅलिसन रिस्केने कारकीर्दीत प्रथमच विम्बल्डनच्या महिला एकेरीच्या अंतिम आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. त्याशिवाय चारपैकी कोणत्याही ग्रँडस्लॅममध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची तिची ही पहिलीच खेप.

अग्रमानांकित बर्टीला नमवण्यासाठी मी ज्याप्रकारे खेळ केला ते पाहून मलाच स्वत:चा अभिमान वाटत आहे. परंतु आताशी फक्त उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुढील सामन्यात अनुभवी सेरेनाला पराभूत करण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावेन.

– अ‍ॅलिसन रिस्के, अमेरिकेची टेनिसपटू