कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी अल्पावधीतच भारतीय संघात आपलं स्थान निश्चीत केलं आहे. मनगटातून चेंडू वळवण्याच्या आपल्या कलेमुळे दोन्ही खेळाडू भारतीय संघाचा अविभाज्य हिस्सा बनले आहेत. या दोन्ही खेळाडूंनी रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजा यांचं वन-डे आणि टी-२० संघातलं स्थान आपल्या नावे केलं आहे. रविंद्र जाडेजा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी या जोरावर अधुनमधून संघात स्थान मिळवतो, मात्र रविचंद्रन आश्विनला वन-डे, टी-२० संघात पूर्णपणे नजरअंदाज करण्यात येतंय. विंडीजमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत रविचंद्रन आश्विनला दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये संघात जागा दिली नाही. यावरुन अनेक माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मते, रविचंद्रन आश्विन हाच भारतीय संघातला सर्वोत्तम फिरकीपटू असून त्याला संघात जागा मिळणं गरजेचं आहे.

अवश्य वाचा – धोनीला सन्मानाने निवृत्ती मिळायला हवी – अनिल कुंबळे

“रविचंद्रन आश्विन अजुनही संघातला सर्वोत्तम फिरकीपटू आहे. मध्यंतरी दुखापतीमुळे त्याला काही सामन्यांमध्ये योग्य ती कामगिरी करता आली नाही. मात्र त्याचा अनुभव लक्षात घेता तो अजुनही सर्वोत्तम फिरकीपटू आहे, त्याचं संघात असणं गरजेचं आहे. अंतिम ११ संघात आश्विनसाठी जागा असायलाच हवी.” कुंबळे cricketnext.com संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. आश्विनच्या नावावर कसोटीत चार शतकं आहेत. जाडेजानेही आपली फलंदाजी सिद्ध करुन दाखवली आहे, त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना अंतिम संघात जागा मिळण्यास काहीच हरकत नसल्याचंही कुंबळेंनी स्पष्ट केलं.

विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेत रविचंद्रन आश्विनला संघात जागा न मिळण्याच्या निर्णयावरही कुंबळेंनी आश्चर्य व्यक्त केलं. “ज्यावेळी ३ जलदगती गोलंदाज आणि २ फिरकीपटू तुमच्या संघाचा भाग असतात त्यावेळी फिरकीपटूंकडूनही फलंदाजीची अपेक्षा केली जाते. त्यामुळे भारत जेव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर जातो तेव्हा आश्विनला संघात संधी मिळायला हवी, परदेशांमध्ये त्याचा खेळ चांगला होतो. संघ व्यवस्थापनाने यावर विचार करायला हवा.” विंडीजविरुद्ध मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेत आश्विनला संघात संधी मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.