आज अफगाणिस्तानशी सामना; भुवनेश्वर-जसप्रीतला विश्रांती मिळण्याची शक्यता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुबई : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान एक बलाढय़ संघ म्हणून नावारूपास येतो आहे. भारतीय संघाने मात्र शानदार विजयांची मालिका कायम राखली आहे. आतापर्यंत पुरेशी संधी न मिळालेल्या मधल्या फळीची अंतिम फेरीच्या दृष्टीने चाचपणी करण्याचे आव्हान भारतापुढे मंगळवारी होणाऱ्या ‘अव्वल चार’ संघांच्या फेरीत असेल.

हाँगकाँगविरुद्ध झगडून विजय मिळवल्यानंतर भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दोन एकतर्फी विजय मिळवले. याचप्रमाणे बांगलादेशलाही आरामात नामोहरम केले. शुक्रवारी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी कर्णधार रोहित शर्मा मधल्या फळीतील फलंदाजांना रशीद खानच्या दर्जेदार फिरकीपुढे चाचपणी घेण्यासाठी उत्सुक आहे.

आशिया चषक स्पर्धेतील आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये शिखर धवन (३२७) आणि रोहित शर्मा (२६९) यांनी सातत्यपूर्ण फलंदाजीचा प्रत्यय घडवला आहे. भारताच्या इथपर्यंतच्या प्रवासात अन्य फलंदाजांचे माफक योगदान मिळाले आहे. त्यानंतरच्या सर्वाधिक एकंदर धावा तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज अंबाती रायुडूने (११६ धावा) केल्या आहेत. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव आणि दिनेश कार्तिक यांना फलंदाजीची पुरेशी संधी मिळालेली नाही.

रोहितने धोनीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले होते. त्या वेळी या माजी कर्णधाराने तणावमुक्त परिस्थितीत ३३ धावा केल्या होत्या. त्यामुळे रशीद खान आणि मुजीब उर रेहमान यांच्यासारख्या गोलंदाजांसमोर मधल्या फळीतील फलंदाजांचा उत्तम सराव होऊ शकेल. नाणेफेक जिंकल्यास भारतीय संघ प्रथम फलंदाजी स्वीकारू शकेल. जेणेकरून छोटेखानी लक्ष्य पेलण्यापेक्षा ५० षटके फलंदाजीचा उत्तम सराव संघाला मिळू शकेल.

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या धिम्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाज वर्चस्वपूर्ण गोलंदाजी करीत आहेत. सर्व गोलंदाजांची सरासरी पाचपेक्षा कमी आहे. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या खात्यावर पाच बळी जमा आहेत. जसप्रीत बुमरा (एकूण ७ बळी) आणि भुवनेश्वर कुमार (एकूण ६ बळी) हे वेगवान गोलंदाज टिच्चून गोलंदाजी करीत आहेत. अंतिम फेरीच्या पाश्र्वभूमीवर भारतीय संघ या दोन्ही महत्त्वाच्या गोलंदाजांना विश्रांती देण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत दीपक चहर, सिद्धार्थ कौल आणि खलील अहमद यांना संधी मिळू शकते.

अफगाणिस्तानसाठी भारताविरुद्ध मिळवलेला विजय अतिशय महत्त्वाचा असेल. स्पर्धात्मकदृष्टय़ा अफगाणी संघ अप्रतिम खेळत आहे, परंतु फक्त अनुभवाची कमतरता तीव्रतेने जाणवत आहे. श्रीलंकेचे आव्हान गटसाखळीतच संपुष्टात आणणाऱ्या अफगाणिस्तानने बांगलादेशवरही धक्कादायक विजय मिळवला आहे.

मात्र ‘अव्वल चार’ संघांच्या अग्निपरीक्षेत अफगाणिस्तानचे कच्चे दुवे समोर आले. पाकिस्तानला अखेरच्या षटकापर्यंत झगडायला लावणाऱ्या अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना विजय मिळवण्यात अपयश आले. याचप्रमाणे बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मुस्ताफिझूर रेहमानचे अखेरच्या षटकातील वैविध्याचा सामना करणे त्यांना कठीण गेले.

संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलील अहमद, दीपक चहर, सिद्धार्थ कौल, मनीष पांडे.

अफगाणिस्तान : मोहम्मद शहझाद, एहसानउल्लाह जमात, जावेद अहमदी, रहमत शाह, असघर स्टॅनकीझाई, हसमत शाहिदी, मोहम्मद नबी, गुलबदिन नैब, रशीद खान, नजिबुल्ला झाद्रान, मुजीब उर रेहमान, अफ्ताब आलम, समिउल्लाह शेनवारी, मुनिर अहमद, सईद अहमद शेर्झाद, अश्रफ, मोहम्मद वफादार.

सामन्याची वेळ : सायं. ५ वा.

’ b: स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2018 india vs afghanistan preview india vs afghanistan
First published on: 25-09-2018 at 02:28 IST