आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये गुरुवारी श्रीलंकेने बांगलादेशला पराभूत करत सुपर फोरमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. श्रीलंका हा भारत, अफगाणिस्तानंतर नंतर सुपर फोरमध्ये जाणारा तिसरा संघ ठरला आहे. आज होणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग सामन्यामधील विजेता संघ सुपर फोरमध्ये जाईल. आजच्या सामन्यामध्ये पराभूत होणारा संघ स्पर्धेमधून बाहेर पडेल तर विजेत ठरणारा संघ अव्वल चार संघांमध्ये सहभागी होत स्पर्धेच्या पुढील टप्प्यासाठी पात्र ठरणार आहे.

हाँगकाँग देऊ शकतो कडवी झुंज
२०२२ च्या आशिया चषकामधील साखळी फेरीतील शेवटचा सामना आज खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी या सामन्यात दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे. जिंकणारा संघ सुपर फोर फेरीमध्ये रविवारी म्हणजेच ४ सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध मैदानात उतरणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाला विजयासाठी झुंजवण्याचं समर्थ्य हाँगकाँगच्या संघात आहेत. भारताविरुद्द या नवख्या संघाने ज्या पद्धतीचा खेळ केलेला तो पाहता आजचा सामना रंजक होईल असा अंदाज आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानचं पारड जड असलं तरी हाँगकाँग चमत्कार करु शकतो असं मानणारेही लोक आहेत.

भारताविरुद्ध केलेली दमदार कामगिरी
हाँगकाँगच्या संघाने भारताविरुद्ध भन्नाट खेळी केली होती. दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ बाद १९२ अशी धावसंख्या उभारली. त्यानंतर १९३ धावांचा पाठलाग करणाऱ्या हाँगकाँगला २० षटकांत ५ बाद १५२ धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. त्यांच्याकडून बाबर हयात (३५ चेंडूंत ४१), किंचित शहा (२८ चेंडूंत ३०) आणि झीशान अली (१७ चेंडूंत नाबाद २६) यांनी चांगली फलंदाजी केली. मात्र, मधल्या षटकांत त्यांना वेगाने धावा न करता आल्याने त्यांचा पराभव झाला. तरीही त्यांनी भारतासारख्या संघाला दिलेली कडवी झुंज कौतुकाचा विषय ठरली.

…तर रविवारी पुन्हा भारत-पाक
त्यामुळेच पाकिस्तान जिंकला तर बरोबर आठवड्यानंतर पुन्हा एकदा रविवारी भारत आणि पाकिस्तानचा संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरलेले पहायला मिळतील. मात्र हाँगकाँगचा विजय झाला तर तो पाकिस्तानला मोठा धक्का ठरण्याबरोबरच भारताची वाट सुखकर करणारा निर्णय असेल. सध्या अ गटामधून भारताने सुपर फोरमध्ये मजल मारली आहे. तर ब गटामधून अफगाणिस्तान आणि श्रीलंकेने सुपर फोरमध्ये स्थान निश्चित केलं आहे.

आजचा सामना कुठे पहायला मिळणार?
पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहे. सात वाजता नाणेफेक होईल. आशिया चषक स्पर्धेचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरुन थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. हाँगकाँग आणि पाकिस्तानचा सामना स्टार स्पोर्ट्सच्या स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स एचडी वन आणि स्टार स्पोर्ट्स वन हिंदीवर पाहता येईल. डिस्ने-हॉटस्टारच्या माध्यमातूनही या सामन्याचा आनंद घेता येणार आहे. मोबाईल, लॅपटॉप आणि अगदी स्मार्ट टीव्हीवरही डिस्ने-हॉटस्टार अॅपच्या माध्यमातून हा सामना पाहता येईल.

चार तारखेचा सामना कुठे पाहता येणार?
चार तारखेला भारताचा सामना पाकिस्तान किंवा हाँगकाँग विरुद्ध होऊ शकतो. हा सामनाही इतर सामन्यांप्रमाणे सायंकाळी साडेसात वाजता स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरुन थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच मोबाईल, लॅपटॉप आणि अगदी स्मार्ट टीव्हीवरही डिस्ने-हॉटस्टार अॅपच्या माध्यमातून हा सामना पाहता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधीच्या सामन्यात काय घडलं?
आशिया चषक स्पर्धेतील बहुचर्चित असा भारत-पाक सामना २८ ऑगस्ट रोजी झाला. या सामन्यात पाकिस्तानला नमवून भारताने दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य भारताने पाच गडी राखून गाठले. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागात आपली भूमिका चोखपणे बजावली. त्याने गोलंदाजीमध्ये तीन गडी बाद करून पाकिस्तान संघाला रोखलं.