ICC Took Big Decision On PCB Demand: आशिया चषक २०२५ स्पर्धा सुरू झाल्यापासून एक मुद्दा तुफान चर्चेत आहे, तो म्हणजे भारत- पाकिस्तान सामना होणार का? क्रिकेट चाहत्यांनी या सामन्यावर बहिष्कार टाकला. पण हा सामना पार पडला आणि भारतीय संघाने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. या सामन्याच्या सुरूवातीला भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधारासोबत हस्तांदोलन करणं टाळलं. सामना झाल्यानंतर भारतीय खेळाडू हस्तांदोलन न करताच ड्रेसिंग रूममध्ये निघून गेले. यावरून चांगलाच वाद पेटला आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डने याचं खापर सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर फोडलं. पीसीबीने पायक्रॉफ्ट यांना आशिया चषकाबाहेर करण्याची मागणी केली होती. यावर आता आयसीसीने मोठी अपडेट दिली आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार,आयसीसीने पीसीबीने केलेली मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डला पुन्हा एकदा तोंडावर पडावं लागलं आहे. आयसीसीने अँडी पायक्रॉफ्ट यांना स्पर्धेतून बाहेर करण्याची मागणी फेटाळून लावली आहे. हा निर्णय पाकिस्तानला काल रात्रीच कळवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डने अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर आरोप केले होते की, नाणेफेकीच्या वेळी पाकिस्तानच्या कर्णधाराने भारतीय कर्णधारासोबत हस्तांदोलन करणं टाळावं, अशी अँडी पायक्रॉफ्ट यांची भूमिका होती. यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डने नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आयसीसीने आता स्पष्ट केलं आहे की मैदानावर उपस्थित असलेल्या एसीसी (एशियन क्रिकेट काउन्सिल)च्या अधिकाऱ्यांनीच पायक्रॉफ्ट यांना कळवलं होतं की, नाणेफेकीच्या वेळी हस्तांदोलन होणार नाही. अँडी पायक्रॉफ्ट यांनी केवळ दिलेल्या आदेशाचं पालन केलं असल्याचं आयसीसीने स्पष्ट केलं आहे. आयसीसीने जर अँडी पायक्रॉफ्ट यांना आशिया चषकातून बाहेर केलं नाही, तर पाकिस्तानचा संघ आशिया चषकावर बहिष्कार टाकेल, अशी धमकी पीसीबीने दिली होती. आता पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून माघार घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नेमकं काय घडलं होतं?
रविवारी भारत- पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना रंगला. दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक झाल्यानंतर दोन्ही कर्णधार हस्तांदोलन न करताच निघून गेले होते. सामना झाल्यानंतर भारतीय खेळाडू हस्तांदोलन न करताच ड्रेसिंग रूममध्ये निघून गेले होते.