दुबई : आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हात न मिळविण्याची घेतलेली भूमिका ही क्रिकेटचा अनादर करणारी होती आणि क्रिकेटपटूंना आदर्श मानणाऱ्या तरुण चाहत्यांसमोर खिलाडूवृत्तीचे हे उदाहरण निश्चितपणे नव्हते, असे वक्तव्य पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने केले.

‘‘या स्पर्धेत भारतीय संघाने जी कृती केली, ती अतिशय निराशाजनक होती. हस्तांदोलन न करणे किंवा चषक न स्वीकारण्याची त्यांची भूमिका ही आमचा नाही, तर क्रिकेटचा अपमान करणारी होती. चांगला संघ कधीच असे करत नाही,’’ असे सलमान म्हणाला.

‘‘अंतिम सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी चषकाबरोबर एकत्रित छायाचित्र काढायचे असते. त्यांनी ते केले नाही. मी छायाचित्र काढून घेतले, कारण आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव आहे. लढतीनंतर आम्ही तिथे उभे राहून पदके घेतली. मला कठोर शब्द वापरायचे नाहीत. मात्र, भारतीय संघाकडून जे काही घडले, ते पूर्णपणे क्रिकेटचा अनादर करणारे होते,’’ याचा सलमानने पुनरुच्चार केला.

सार्वजनिक ठिकाणी वेगळे वर्तन

सलमान आघाने या वेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवची भूमिका न पटणारी होती हेच वारंवार सांगितले. ‘‘खासगीत तो ज्या पद्धतीने वागला, त्यापेक्षा सार्वजनिक ठिकाणी तो वेगळा वागला. हे अनाकलनीय आहे. स्पर्धापूर्व पत्रकार परिषद आणि पंचांच्या बैठकीला आम्ही एकत्र आलो, तेव्हा सूर्यकुमारने माझ्याशी हस्तांदोलन केले. मात्र, जेव्हा सार्वजनिक ठिकाणी (मैदानावर) कॅमेऱ्यासमोर आलो, तेव्हा त्याने हस्तांदोलनास विरोध केला. त्याला तसे करण्यास कोणीतरी सांगितले असणार हे मला ठाऊक आहे. हस्तांदोलन करायचे की नाही, याचा निर्णय सूर्यकुमारवर सोडला असता, तर त्याने नक्कीच वेगळी भूमिका घेतली असती. त्याने हात मिळवणे अशाप्रकारे टाळले नसते,’’ असेही सलमान म्हणाला.

भारतीय संघाला चषक न देण्याचेही सलमानने समर्थन केले. ‘‘आतापर्यंत आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुखच विजेत्या संघाला चषक प्रदान करत होते. त्यांचा तो हक्कच आहे. भारतीय संघाने या वेळी मोहसीन नक्वी पाकिस्तानचे म्हणून चषक स्वीकारण्यास नकार दिला. आता तुम्हाला त्यांच्याकडून चषक घ्यायचाच नसेल, तर तुम्हाला चषक मिळणारच कसा?’’ असे सलमान म्हणाला.

अशा प्रकारच्या घटना नवोदित क्रिकेटपटूंसाठी चुकीचे उदाहरण आहे, असे सांगून सलमान म्हणाला, ‘‘असे घडताना मी पहिल्यांदाच पाहिले. जे काही घडले, ते क्रिकेटसाठी वाईट आहे. हे लवकरच थांबायला हवे.’’

पाकिस्तानकडूनही दान…

पत्रकार परिषदेच्या शेवटी सलमान आघाने संपूर्ण स्पर्धेतील सामन्यांचे मानधन पाकिस्तान संघाच्या वतीने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना दिले जाईल, असे सांगितले.