Andy Pycroft IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर जोरदार विजय मिळवला. या सामन्यात एक मुद्दा तुफान गाजला, तो म्हणजे हस्तांदोलनाचा मुद्दा. नाणेफेक झाल्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार हस्तांदोलन करतात, पण या सामन्यात असं काहीच झालं नाही. सामना जिंकल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी हात न मिळवताच न थेट पॅव्हेलियनची वाट धरली. यामुळे पाकिस्तानचा तीळपापड झाला. हा मुद्दा गाजल्यानंतर पीसीबीने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना पॅनलमधून काढण्याची मागणी केली. आता सामनाधिकारी यांच्या पॅरडी अकाऊंटवरून अँडी पायक्रॉफ्ट यांच्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड स्वत:च हित साध्य करण्यासाठी कोणावर काय आरोप करेल याचा काहीच नेम नाही. आधी पीसीबीने भारतीय खेळाडूंनी हात मिळवणी न केल्याची तक्रार सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडे केली. त्यानंतर आयसीसीकडे अँडी पायक्रॉफ्ट यांना काढून टाकण्याची मागणी केली. ते इतक्यात थांबले नाही, तर आता आणखी मोठी मागणी केली आहे. पीसीबीने धमकी देत म्हटलं आहे की,जर आयसीसीने अँडी पायक्रॉफ्ट यांना पॅनलमधून बाहेर केलं नाही तर ते स्पर्धेतून माघार घेतील.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डने अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर आरोप केला आहे की, नाणेफेकीच्या वेळी अँडी पायक्रॉफ्ट यांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांना हात मिळवू नका असं सांगितलं होतं. हा मुद्दा पीसीबीने उचलून धरला असून त्यांना आशिया चषकातून बाहेर करण्याची मागणी केली आहे. यावर आता अँडी पायक्रॉफ्ट यांनी आपली प्रतिक्रिया दिल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अँडी पायक्रॉफ्ट यांच्या पॅरडी एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यात लिहिलं आहे की,”काल घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर मी ठाम आहे. क्रिकेट या खेळाला बदनाम करण्याची पाकिस्तानची पहिली वेळ नाही. याआधी हफीज आणि अजमल (ज्यांची चकिंगसाठी मी तक्रार केली होती) असो किंवा सध्याचे फहीम आणि अबरारसारखे खेळाडू असो. म्हणूनच मला खबरदारी घ्यावी लागली.”
सामनाधिकारी आणि आयसीसीचे अंपायर्स यांच्यावर काही बंधनं असतात, त्यामुळे मैदानावर घडलेल्या कुठल्याही प्रकरणावर ते सहसा प्रतिक्रिया देत नाही. आता पॅरडी अकाऊंटवरून त्यांना लक्ष केलं जात आहे.