Muhammad Waseem World Record in Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ मध्ये युएईच्या संघाने ओमानवर विजय मिळवला आहे. युएईने ओमान संघावर ४२ धावांनी मोठी विजय मिळवला. युएईने प्रथम फलंदाज करताना ५ विकेट्स गमावत १७२ धावांची खेळी केली. या धावसंख्येत युएईचा कर्णधार मुहम्मद वसीमच्या ६९ धावांच्या खेळीचं मोठं योगदान आहे. या खेळीसह वसीमने मोठा विश्वविक्रम रचला आहे.
युएई संघाचे सलामीवीर अलिशान शरफु आणि मुहम्मद वसीम यांनी संघाला वादळी सुरूवात करून दिली. शरफुने ३८ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ५१ धावांची खेळी केली. तर मुहम्मद वसीमने ५४ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ६९ धावांची खेळी करत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. यानंतर मोहम्मद झोएबने ३१ धावांची खेळी केली आणि ओमानला विजयासाठी २० षटकांत १७३ धावांचं आव्हान दिलं.
युएईचा आशिया चषकात ओमानवर दणदणीत विजय
ओमानचा संघ लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजीतही चांगली कामगिरी करू शकला नाही. संघातील एकही खेळाडू २५ धावांचा आकडा गाठण्यात अपयशी ठरला आणि परिणामी युएईच्या भेदक गोलंदाजीपुढे १३० धावांवर सर्वबाद झाला. यासह युएईने ४२ धावांनी मोठा विजय नोंदवला.
युएईच्या कर्णधाराने या सामन्यादरम्यान टी-२० क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे. मुहम्मद वसीम आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद ३ हजार धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने या बाबतीत इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलरचा विक्रम मोडला आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये चेंडूंच्या बाबतीत सर्वात जलद ३ हजार धावा करण्याचा विक्रम आता मुहम्मद वसीमच्या नावावर आहे. त्याने १९४७ चेंडूंमध्ये ३ हजार धावा पूर्ण केल्या. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जोस बटलरने २०६८ चेंडूंमध्ये ३ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज आरोन फिंच तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २०७७ चेंडूत ३ हजार धावा पूर्ण केल्या. त्याचा सहकारी डेव्हिड वॉर्नरने २११३ चेंडूत ३ हजार धावा आणि रोहित शर्माने २१४९ चेंडूत ३ हजार धावा पूर्ण केल्या.
आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद ३ हजार धावा करणारे फलंदाज (चेंडूंच्या बाबतीत)
१९४७ चेंडू: मोहम्मद वसीम
२०६८ चेंडू: जोस बटलर
२०७७ चेंडू: आरोन फिंच
२११३ चेंडू: डेव्हिड वॉर्नर<br>२१४९ चेंडू: रोहित शर्मा</p>
मुहम्मद वसीमने या खेळीदरम्यान आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो असोसिएट देशांमध्ये ३ हजार टी२० धावा करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. यापूर्वी, असोसिएट देशासाठी असा विक्रम करणारा पहिला खेळाडू मलेशियाचा विरनदीप सिंग होता.