ICC Decision On PCB: आशिया चषक २०२५ स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. हा सामना सुरू होण्यापूर्वी आणि सामना झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं. हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डला मुळीच आवडलेलं नाही. सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी भारतीय संघावर कुठलीही कारवाई न केल्याने पीसीबीने पायक्रॉफ्ट यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास पीसीबीने आशिया चषक स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. मात्र आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली आहे.
आयसीसीने ही मागणी फेटाळल्यानंतर पीसीबीने दिलेला शब्द खरं ठरवून स्पर्धेतून माघार घेणं अपेक्षित आहे. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुन्हा एकदा घुमजाव करणार असल्याचा दावा माध्यमातील वृक्तात केला जात आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, आयसीसीने अँडी पायक्रॉफ्टवर कारवाई न केल्यास पाकिस्तानने आशिया चषक २०२५ स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची औपचारिक भूमिका घेतलेली नाही. यावरून असं दिसत आहे की, माध्यमांमध्ये पाकिस्तानचा संघ या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची चर्चा सुरू असली तरीदेखील पीसीबी असा निर्णय घेणार नाही.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत लिहिले होते की, “पीसीबीने मॅस रेफ्रींनी आयसीसीच्या आचारसंहिता आणि एमसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार आयसीसीकडे केली आहे. आयसीसीने मॅच रेफ्रींना तात्काळ काढून टाकावं”, अशी मागणी देखील केली आहे. ही मागणी आयसीसीने फेटाळून लावली आहे. आता पीसीबी काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील सामना रविवारी पार पडला. या सामन्यात पाकिस्तानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला २० षटकांअखेर १२७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करँण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने दमदार सुरूवात करून दिली. त्याने ३१ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने देखील ३१ धावांची खेळी केली. शेवटी सूर्यकुमार यादवने नाबाद ४७ धावांची खेळी केली. शेवटच्या चेंडूवर त्याने षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.