Asia Cup 2025 How Pakistan Can Qualify for Final: आशिया चषक २०२५ मधील सुपर फोर टप्प्याला सुरूवात झाली. भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करत विजयासह या मोहिमेला सुरूवात केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने सुपर फोरमधील सामन्यातही पाकिस्तानचा ६ विकेट्सने सहज पराभव केला. अभिषेक शर्मा भारताच्या विजयाचा नायक ठरला. पण या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडू शकतो.
भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका हे संघ सुपर फोरसाठी पात्र ठरले आहेत. सुपर फोरमध्ये प्रत्येक संघ ३-३ सामने खेळणार आहे आणि सुपर फोरच्या गुणतालिकेत टॉप-२ संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र होतील.
भारताचा पुढील सुपर फोर सामना २४ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध होईल. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवल्यास संघाचं अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल, तर दोन दिवसांनी त्यांचा सामना श्रीलंकेविरूद्ध होईल. तर दुसरीकडे, भारताकडून झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानच्या अंतिम फेरीच्या संधी आणखी कमी झाल्या आहेत.
अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला आता केवळ बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्धच विजय मिळवावा लागणार नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवत गुणतालिकेत चांगला नेट रन रेट असणं महत्त्वाचं आहे.
पाकिस्तानचे सुपर फोरमधील उर्वरित दोन सामने करो या मरो
२३ सप्टेंबरला पाकिस्तानचा सामना श्रीलंकेशी होईल. दोन्ही संघांनी त्यांचे सुपर फोरमधील पहिले सामने गमावले. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांसाठी विजय आवश्यक असेल. पण पाकिस्तान किंवा श्रीलंका यांच्यातील एका संघाच्या पराभवामुळे त्यांचे आशिया चषकातील अभियान जवळजवळ संपुष्टात येईल.
सुपर फोर गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर आहे. भारत आणि बांगलादेश दोघांनीही त्यांचे सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. नेट रन रेट फरकामुळे भारत पहिल्या स्थानी तर बांगलादेश दुसऱ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका आणि पाकिस्तान अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
जर सलमान आघाचा संघ श्रीलंकेविरुद्ध पराभूत झाला तर त्यांचा प्रवास जवळजवळ संपेल, कारण त्यानंतर अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेशविरुद्धचा पुढचा सामना जिंकावा लागेल. . बांगलादेश आणि श्रीलंका प्रत्येकी एक सामना गमावतील, अशी प्रार्थना पाकिस्तानला करावी लागेल. पाकिस्तानने आपला नेट रन रेट सुधारण्यावरही लक्ष देणं गरजेचं असणार आहे. अन्यथा, रन रेटमुळे ते स्पर्धेतून बाहेर पडू शकतात.