Srilanka vs Afghanistan: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील ११ वा सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना सुपर ४ मध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने ३ संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. अफगाणिस्तानला सुपर ४ मध्ये प्रवेश करण्यासाठी हा सामना जिंकायचा होता. तर श्रीलंकेला धावांचा पाठलाग करताना १०१ धावांचा पल्ला गाठायचा होता. तर अफगाणिस्तानचा पराभव होताच बांगलादेशचा संघ सुपर ४ मध्ये प्रवेश करणार होता. अफगाणिस्तानने हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेसमोर १७० धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने ६ गडी राखून विजय मिळवला. यासह श्रीलंकेचा संघ सुपर ४ साठी पात्र ठरला आहे.
श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी २० षटकात १७० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेकडून सलामीला आलेल्या पथुम निसंकाला हवी तशी सुरूवात करून देता आली नाही. तो अवघ्या ६ धावांवर माघारी परतला. मात्र सलामीला आलेला कुसल मेंडिस शेवटपर्यंत उभा राहिला आणि श्रीलंकेला विजय मिळवून दिला. त्याने नाबाद ७४ धावांची खेळी. तर कुसल परेराने २८ धावा केल्या. कर्णधार चरिथ असलंकाने १७ धावा केल्या. या विजयासह श्रीलंकेचा संघ सुपर ४ साठी पात्र ठरला आहे. तर अफगाणिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला असून बांगलादेशचा संघ ब गटातून सुपर ४ फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. तर बांगलादेशचा संघ दुसरा संघ ठरला आहे.
या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांअखेर ८ गडी बाद १६९ धावा केल्या. या सामन्यात अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. सलामीला फलंदाजी करताना रहमानुल्लाह गुरबाजने १४ धावा केल्या. तर सेदीकुल्लाह अटलने १८ धावा केल्या. इब्राहिम जदरानने २४ धावा केल्या. मोहम्मद नबी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने ३ चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने ६० धावांची खेळी केली. राशिद खानने २४ धावा केल्या. २० षटकांअखेर अफगाणिस्तानने ८ गडी बाद १६९ धावा केल्या.
सुपर ४ मध्ये जाणारे ४ संघ ठरले
या स्पर्धेतील अ गटातून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी सुपर ४ मध्ये आधीच प्रवेश केला होता. तर ग्रुप बी मध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तिन्ही संघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली. अफगाणिस्तानला सुपर ४ मध्ये प्रवेश करण्यासाठी केवळ हा सामना जिंकायचा होता. पण ते असं करू शकलेले नाहीत. त्यामुळे बांगलादेशचा संघ सुपर ४ साठी पात्र ठरला आहे. तर धावांचा पाठलाग करत असताना १०१ धावा करताच श्रीलंकेचा संघ सुपर ४ साठी पात्र ठरला. त्यामुळे श्रीलंकेने हा सामना गमावला असता तरीदेखील श्रीलंकेचा संघ सुपर ४ साठी पात्र ठरला असता. अशा स्थितीत, बांगलादेशचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला असता. येत्या शनिवारपासून सुपर ४ फेरीतील सामन्यांना सुरूवात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना २१ सप्टेंबरला होणार आहे.