India Chase 58 Runs Target in just 27 Balls: भारतीय संघाने पॉवरप्लेमध्येच युएईविरूद्ध ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने पहिल्याच सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत आपलं खातं उघडलं. टीम इंडियाने अवघ्या २७ चेंडूत ५८ धावांचं लक्ष्य गाठत दणक्यात सुरूवात केली आहे. कुलदीप यादवने ४ तर शिवम दुबेने ३ विकेट्स घेत युएईच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडलं.
भारतीय संघाने त्यांच्या शानदार फलंदाजी आणि गोलंदाजीसह यूएईचा पराभव करून स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांच्या जोडीने भारताने सहज सामना जिंकला. सूर्यकुमार यादवने २ चेंडूत ७ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
अनुनभवी युएईसाठी अलिशान शराफू आणि कर्णधार मुहम्मद वासीम यांनी संघाला २६ धावांची सलामी दिली. टीम इंडियाचं प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रीत बुमराहने शराफूला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. त्याने २२ धावांची खेळी केली. पुढच्याच षटकात मुहम्मद झोहेबला वरुण चक्रवर्तीने तंबूचा रस्ता दाखवला. राहुल चोप्रा कुलदीप यादवची पहिली शिकार ठरला. शिवम दुबेने असिफ खानला स्थिरावू दिलं नाही. खेळपट्टीवर नांगर टाकण्याची इच्छा असलेल्या वासीमला कुलदीपने पायचीत केलं. त्याने १९ धावांची खेळी केली. कुलदीपनेच हर्षित कौशिकला माघारी धाडलं.
शिवम दुबेची मध्यमगती गोलंदाजी ध्रुव पराशरसाठी बाऊन्सर ठरली. तो एका धावेचं योगदान देऊ शकला. अक्षर पटेलने आपली कुशलता सिद्ध करत सिमरजीतला तंबूत धाडलं. कुलदीप यादवने हैदर अलीला बाद केलं. चांगल्या सुरुवातीनंतर युएईचा डाव पत्त्याचा बंगला कोसळावा तसा कोसळला. १३.१ षटकात युएईचा डाव ५७ धावांतच गडगडला. कुलदीप यादवने २.१ षटकात अवघ्या ७ धावात ४ विकेट्स पटकावल्या. शिवम दुबेने २ षटकात केवळ ४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. कुलदीप यादवला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
युएईने दिलेले ५८ धावांचे लक्ष्य भारताने २७ चेंडूत गाठलं. भारताकडून अभिषेक शर्माने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत आक्रमक सुरूवात केली. अभिषेकने १६ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह झटपट ३० धावा केल्या. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अभिषेक झेलबाद झाला. तर शुबमन गिलने ९ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह २० धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने ७ धावा करत चौकारासह संघाला विजय मिळवून दिला. युएईकडून जुनैद सिद्दिकीने एक विकेट घेतली.
कुलदीप यादवला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. भारतीय संघाचा पुढील सामना १४ सप्टेंबरला रविवारी पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. सर्वांच्या नजरा या सामन्यावर आहेत.