India vs Pakistan Match Tickets: भारत विरूद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, तेव्हा क्रिकेट चाहत्यांना थरारक सामना पाहायला मिळत असतो. हे दोन्ही संघ कुठल्याही द्विपक्षीय मालिकेत आमनेसामने येत नाहीत. दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धेत आणि आशिया चषकात आमनेसामने येत असतात. त्यामुळे क्रिकेट चाहते भारत- पाकिस्तान सामन्याच्या तिकीटांची आतुरतेने वाट पाहत असतात. तिकीटांची ऑनलाईन विक्री सुरू होताच, अवघ्या काही मिनिटात तिकीटं सोल्डआऊट होतात. मात्र, आशिया चषक २०२५ स्पर्धेत उलट चित्र पाहायला मिळालं आहे.
आशिया चषक २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. भारत- पाकिस्तान सामन्याचा थरार येत्या १४ सप्टेंबरला रंगणार आहे. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे. सामना सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, अजूनही या सामन्याच्या तिकीटांची विक्री झालेली नाही. आशिया चषक २०२५ स्पर्धेतील हा प्रमुख सामना आहे. पण या महत्वाच्या सामन्याच्या तिकीटांची विक्री न झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, तिकीट विक्री करणाऱ्या ऑनलाईन साईटवर अजूनही तिकीटं उपलब्ध आहेत. ज्या तिकिंटाची किंमत अडीच लाख रूपये इतकी आहे. या महागड्या तिकिटासह गाडी पार्क करण्याचा पास, अनलिमिटेड जेवण आणि व्हिआयपी लाऊंच सारख्या सुविधा मिळतात. इतरवेळी या तिकिटांची किंमत जास्त असते. तरीदेखील ही तिकीटं अवघ्या काही मिनिटात सोल्ड आऊट होत असतात. मात्र, यावेळी असं काहीच झालेलं नाही.
नेमकं कारण काय?
काही दिवसांपूर्वी भारत- पाकिस्तान सामना होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र भारत सरकारने अनुमती दिल्याने हा सामना होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या सामन्याला भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून विरोध केला जात आहे. एप्रिल महिन्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला करून निष्पाप भारतीयांचा जीव घेतला होता. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध केला जात आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी देखील या सामन्याला विरोध केला होता. पण सरकारने या सामन्यासाठी अनुमती दिल्याने हा सामना खेळवला जाणार आहे.