India and Pakistan captains Avoid Shaking Hands: आशिया चषक २०२५ ला आजपासून म्हणजेच ९ सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. टी-२० विश्वचषक २०२६चा विचार करता यंदाचा आशिया चषक टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. पहिला सामना हाँगकाँग आणि अफगाणिस्तान या संघांमध्ये खेळवला जाईल. तत्पूर्वी सर्व ८ संघांच्या कर्णधारांचे ट्रॉफीबरोबर फोटोशूट झालं आणि त्यानंतर कर्णधार पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. यादरम्यानच्या एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
आशिया चषक ९ ते २८ सप्टेंबरदरम्यान खेळवला जाणार आहे. आशिया चषकात प्रथमच ८ संघ खेळताना दिसतील. या ८ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. ८ पैकी ४ संघ म्हणजेच दोन्ही गटातून दोन दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील आणि त्यानंतर उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी संघांची निवड होईल.
आशिया चषकापूर्वीच्या कर्णधारांच्या पत्रकार परिषदेत सर्व ८ संघांचे कर्णधार उपस्थित होते. यादरम्यान अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खान आणि भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव मध्यभागी बसले होते. तर रशीदच्या उजव्या बाजूला पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा बसला होता. पत्रकार परिषदेत कर्णधारांना प्लेईंग इलेव्हन आणि तयारीबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले.
आशिया चषक पत्रकार परिषद संपल्यानंतर स्टेजवर काय घडलं?
कर्णधारांची पत्रकार परिषद संपल्यानंतर सर्व संघांचे कर्णधार एकमेकांना हस्तांदोलन करत होते. पण भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा सलमान अली आघा यांनी एकमेकांना हस्तांदोलन न केल्याची चर्चा आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सूर्यकुमार यादव युएईच्या कर्णधाराला हात मिळवत आहे. तर रशीद खान व श्रीलंकेचा चरिथ असलंकादेखील तिथेच उभे आहेत. दरम्यान पाकिस्तानचा कर्णधार स्टेजवरून खाली उतरताना दिसत आहे. पत्रकार परिषदेनंतरचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वीदेखील उपस्थित होते. त्यांनी सर्व संघांच्या कर्णधारांसह फोटोदेखील काढला. हा फोटोदेखील आता व्हायरल होत आहे.
आशिया चषक स्पर्धेची बक्षीसाची रक्कम
आशिया चषक २०२५ हा ८ संघांमध्ये खेळवला जाणार आहे. ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, ओमान, हाँगकाँग, श्रीलंका, बांगलादेश आणि युएई या संघांचा समाेवश आहे. तर टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या बक्षीसाची रक्कम २.८ कोटी इतकी आहे.