आशिया चषक २०२५ अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघ युएईविरूद्ध सामन्याने मोहिमेला सुरूवात करणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना १४ सप्टेंबरला असणार आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी दोन्ही संघ दुबईला पोहोचले आहेत. भारत आणि पाकिस्तानचे संघ एकत्र सराव करत आहेत. पण यादरम्यान पाहा काय घडलं?
आशिया चषक २०२५ पूर्वी दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ दुबईतील आयसीसी अकादमीच्या मैदानावर सराव करताना दिसले. दोन्ही संघांच्या सरावाचे मैदान एकच होते, फक्त नेट्स वेगळे होते. साधारण क्रिकेटमधील संघ कोणत्याही स्तरावर दिसले भेटले तरी एकमेकांची भेट घेतात, पण इथे चित्र मात्र उलट दिसलं.
दुबईतील आयसीसी अकादमीतील चित्राने काल संध्याकाळी सर्वांचं लक्ष वेधलं. एका बाजूला भारतीय फलंदाजांनी फटकेबाजी करत चेंडू आकाशात झेपावले, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी खेळाडू शांतपणे सराव करत होते. दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकाच वेळी सराव करताना दिसले. महत्त्वाचं म्हणजे, या दोन्ही संघांमध्ये कुठलाही संवाद किंवा साधारण हस्तांदोलनही झालं नाही.
इनसाईड स्पोर्ट्सच्या अहवालानुसार, एकाच मैदानावर सराव करूनही भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंनी हस्तांदोलन केलं नाही. यामागचं कारण एकमेकांना न भेटणं असू शकतं. जेव्हा पाकिस्तानी संघ दुबईतील आयसीसी अकादमीमध्ये पोहोचला तेव्हा टीम इंडियाच्या सरावाला आधीच सुरूवात झाली होती. पाकिस्तानी खेळाडूंनीही भारतीय खेळाडूंना नेटमध्ये घाम गाळताना पाहिले. त्यानंतर, ते त्यांच्या सराव आणि ड्रिलिंगमध्ये व्यस्त झाले.
पाकिस्तान संघ ६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजल्यानंतर दुबईतील आयसीसी अकादमीत पोहोचला. आशिया चषकापूर्वी तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यासाठी सराव करत होते. टी-२० तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. अफगाणिस्तानने या मालिकेत एकदा पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यामुळे पाकिस्तानचा संघ थोडा सावध आहे.
आशिया चषक ९ सप्टेंबरपासून सुरू होईल. पण भारत १० सप्टेंबरपासून आपल्याला मोहिमेला सुरूवात करेल. तर पाकिस्तानी संघ १२ सप्टेंबर रोजी आपला पहिला सामना खेळेल. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान आशिया चषक २०२५ च्या दुसऱ्या सामन्यात एकमेकांसमोर येतील.
यंदा आशिया चषक टी-२० फॉरमॅटमध्ये आयोजित केला जात आहे. पण आशिया कप टी-२० फॉरमॅटमधील सामन्यांमध्ये भारतीय संघ आघाडीवर आहे. दोन्ही संघ आतापर्यंत टी-२० आशिया चषकामध्ये ३ वेळा एकमेकांसमोर आले आहेत, ज्यामध्ये भारताने २ वेळा आणि पाकिस्तानने एकदा विजय मिळवला आहे.