Jasprit Bumrah Clean Bowled Alishan Sharafu Video: आशिया चषक २०२५ मधील भारताचा पहिला सामना युएईविरूद्ध खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक भारताने जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने सलग १५ वेळा नाणेफेक गमावल्यानंतर अखेरीस नाणेफेक जिंकली आहे. तर सामन्यातील तिसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराहने भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

भारतीय संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून एकट्या बुमराहला संधी दिली. हा निर्णय पाहून सुरूवातीला सर्वच जण चकित झाले. वेगवान गोलंदाजाशिवाय टीम इंडिया ३ फिरकीपटूंसह उतरली आहे. तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या आणि शिवम दुबेला संधी दिली गेली आहे.

हार्दिक पंड्याने भारताकडून गोलंदाजीला सुरूवात केली. त्याच्या षटकात युएईचा सलामीवीर शराफुने दोन चौकार लगावले. दुसरे षटक बुमराहला देण्यात आले आणि त्याच्या अखेरच्या चेंडूवरही शराफुने चौकार लगावला. तर अक्षर पटेलच्या तिसऱ्या षटकात शराफुने षटकार खेचत शानदार फटकेबाजी केली.

जसप्रीत बुमराहने भारताला मिळवून दिला ब्रेकथ्रू

चौथ्या षटकात बुमराह परत गोलंदाजीसाठी आला. मोहम्मद वसीम स्ट्राईकवर होता. बुमराहने स्लोअर चेंडू टाकला. तर पुढचे दोन्ही चेंडू बुमराहने शॉर्ट बॉल टाकले. तिसऱ्या चेंडूवर वसीमने एक धाव घेत शराफुला स्ट्राईक दिली. तितक्यात बुमराहने चौथ्या चेंडूवर कमालीचा यॉर्कर टाकत क्लीन बोल्ड केलं. बुमराहने शॉर्ट आणि स्लोअर चेंडू टाकत असताना अचानक यॉर्कर टाकला आणि फलंदाजाला चकित केलं.

जसप्रीत बुमराहने आपल्या चतुर गोलंदाजीच्या जोरावर संघाला पहिली विकेट मिळवून दिली. अलीशान शराफु १७ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह २२ धावा करत झेलबाद झाला.