Kuldeep Yadav On England Test Series Snub: भारताचा उत्कृष्ट फिरकीपटू कुलदीप यादवच्या फिरकीच्या बळावर युएईविरूद्धचा सामना सहज जिंकला आणि दणक्यात आशिया चषक मोहिमेला सुरूवात केली. टीम इंडियाने युएईने दिलेलं लक्ष्य अवघ्या २७ चेंडूत गाठत ऐतिहासिक विजय मिळवला. कुलदीप यादवने एका षटकात ३ विकेट्स घेत सामन्याचा रोख बदलला. यानंतर शिवम दुबेने ३ विकेट्स घेत इतर गोलंदाजांनीही चांगली साथ दिली आणि युएईचा संघ ५७ धावांवर सर्वबाद झाला.

कुलदीप यादवने २.१ षटकांत फक्त सात धावा देऊन चार बळी घेतले. इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी न मिळालेल्या कुलदीपने संधी मिळताच धुव्वा उडवला. आता त्याने सामन्यानंतर यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर टी-२० क्रिकेटमधील पुनरागमनाचं श्रेय कोणाला दिलं आहे, जाणून घेऊया.

युएई विरुद्धच्या सामन्यात कुलदीप सामनावीर ठरला. त्याला या फॉरमॅटमध्ये आठ वर्षांनी हा सामनावीराचा पुरस्कार जिंकण्याची संधी मिळाली. कुलदीपला शेवटचा सामनावीर पुरस्कार २०१८ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध मिळाला होता.

इंग्लंडविरूद्ध मालिकेत खेळण्याची संधी न मिळाल्याबाबत कुलदीप यादवचं मोठं वक्तव्य

कुलदीप यादव सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर म्हणाला, “संघाचा भाग असतानाही, अंतिम संघात स्थान न मिळण्याचं वाईट वाटतं. स्वत:ला मॅचफिट ठेवणं, सराव करत राहणं आवश्यक असतं. अँड्रियनचे खूप आभार त्यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव केला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करता आली याचं समाधान आहे. संघाच्या विजयात योगदान देता आलं हे महत्त्वाचं. टी२० प्रकारात योग्य टप्प्यावर गोलंदाजी करता येणं फार आवश्यक असतं, काही षटकात सामन्याचं चित्र पालटू शकतं. फलंदाजांचं मन ओळखणं हे कसब आहे.

कुलदीप हा टी-२० क्रिकेटमधील एक मॅचविनर खेळाडू आहे. या सामन्यापूर्वी, त्याने ४० टी-२० सामन्यांमध्ये १४.०७ च्या उल्लेखनीय सरासरीने ६९ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये दोन वेळा पाच विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. २०२४ च्या भारताच्या टी-२० विश्वचषक विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्याने पाच सामन्यांमध्ये १० विकेट्स घेतल्या होत्या.

कमालीची आकडेवारी असूनही इंग्लंडविरुद्धच्या अलिकडच्या पाच सामन्यांच्या मालिकेत त्याला दुर्लक्षित करण्यात आले, जी २-२ अशी बरोबरीत राहिली. या कामगिरीसह कुलदीपने आपल्या चतुर गोलंदाजीची चुणूक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.