भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्मा सोमवारी रात्री कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये दिसल्याने चाहत्यांच्या शंकाकुशंकांना उधाण आलं आहे. रोहित नेमका कोणत्या कारणासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता त्याचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. मात्र चाहत्यांनी रोहित शर्माला निरोगी राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टी२० आणि टेस्ट प्रकारातून निवृत्त झालेला रोहित शर्मा फक्त वनडे प्रकारात खेळतो. १९ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेद्वारे रोहित संघात दिसणार आहे. यासाठी त्याचे चाहते आसुसलेले आहेत. मात्र हॉस्पिटलमधल्या व्हीडिओमुळे चाहत्यांच्या मनात धाकधूक वाढली आहे.

रोहितने काही दिवसांपूर्वीच बंगळुरूस्थिती नॅशनल क्रिकेट अकादमीत फिटनेस टेस्ट दिली. या टेस्टमधील त्याच्या कामगिरीबाबत वैद्यकीय चमू समाधानी आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो खेळेल अशी खात्री चाहत्यांना आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित भारतासाठी खेळलेलाच नाही कारण त्याने टेस्ट आणि टी२० प्रकारातून निवृत्ती स्वीकारली आहे. रोहितच्याच नेतृत्वात भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद नावावर केलं होतं.

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार होता. रोहित त्या संघाचा भाग असेल अशी चिन्हं होती मात्र त्याआधीच रोहितने टेस्टमधून निवृत्तीचा निर्णय घेत चाहत्यांना धक्का दिला. दोन प्रकारातून निवृत्ती घेतली असली तरी वनडेमध्ये खेळत राहणार असल्याचं रोहितने सांगितलं होतं. २०२७ मध्ये वनडे वर्ल्डकप होणार आहे. रोहित त्यात खेळेल अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.

ऑस्ट्रेलिया दौरा रोहितच्या उर्वरित वनडे कारकिर्दीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. रोहितसह विराट कोहलीसाठीही हा दौरा कळीचा आहे. कारण हे दोघं पस्तिशीत आहेत. वर्ल्डकपला आणखी २ वर्षांचा कालावधी आहे. तोपर्यंत हे दोघं फिट राहतील आणि कामगिरीत सातत्य असेल अशी चाहत्यांना आशा आहे. मात्र युवा खेळाडूही दमदार कामगिरी करत आहेत. अशा परिस्थितीत कोहली-रोहित जोडीचं संघातलं स्थान पक्कं नाही. दोघांनाही फॉर्म आणि फिटनेस सातत्याने सिद्ध करावा लागेल. यादृष्टीने ऑस्ट्रेलियाची मालिका निर्णायक ठरणार आहे.

वनडे कर्णधारपद सोडणार?

वनडे प्रकारात खेळत राहणार असला तरी रोहित या प्रकाराचे कर्णधारपद सोडणार अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. भविष्याचा विचार करता रोहितच्या जागी शुबमन गिलच्या नावाचा विचार होऊ शकतो. अनुभवाच्या बळावर श्रेयस अय्यरच्या नावाचा वनडे कर्णधारपदासाठी विचार होऊ शकतो. ऑल फॉरमॅट कॅप्टन म्हणून गिलच्या नावाला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी टेस्ट संघाचा कर्णधार म्हणून शुबमन गिलच्या नावाची घोषणा झाली. शुबमनने ७०० पेक्षा धावा आणि उत्तम नेतृत्वगुण दाखवत हा निर्णय योग्य असल्याचं सिद्ध केलं. भारताने ५ सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. आशिया चषकासाठी जाहीर झालेल्या संघात शुबमनचं पुनरागमन झालं आहे. तो संघाचा उपकर्णधार असणार आहे. सलामीवीर फलंदाज आणि उपकर्णधार अशी दुहेरी जबाबदारी शुबमनच्या खांद्यावर असेल. वनडे प्रकारात शुबमन संघाचा भाग आहेच. भविष्याचा विचार करता त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली जाऊ शकते.