Shreyas Iyer on Asia Cup 2025 Snub: आशिया चषक २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर फलंदाज श्रेयस अय्यरला संधी न दिल्याने चर्चांना उधाण आलं होतं. भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची वर्षभरातील कामगिरी पाहता त्याला आशिया चषकासाठी संघात संधी मिळेल अशी शक्यता होती. पण संघ जाहीर होताच अय्यरच्या नावाचा समावेश नव्हता. आता श्रेयसने पहिल्यांदा याबाबत वक्तव्य केलं आहे.

आशिया चषक २०२५ उद्या म्हणजेच ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यापूर्वीच एका मुलाखतीत श्रेयस अय्यरने संघात निवड न झाल्याबद्दल वक्तव्य केलं आहे. आयपीएल २०२५ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फलंदाजांपैकी एक असूनही, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या नेतृत्त्वाखालील निवड समितीने त्याची निवड केली नाही.

आशिया चषकासाठी भारतीय संघातून वगळल्यानंतर अय्यरने पहिल्यांदाचं केलं वक्तव्य

श्रेयस अय्यरने IQOO इंडिया पोडकास्टला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “जेव्हा आपल्याला ठाऊक असतं की आपण संघात, प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यास पात्र आहोत आणि तरीही आपली निवड झालेली नसते, तेव्हा अजून वाईट वाटतं. पण त्याचवेळी, जेव्हा कळतं की एखादा खेळाडू सातत्याने संघासाठी चांगली कामगिरी करत आहे आणि संघासाठी सर्वाेत्तम देत आहे. आपलं सर्वोत्तम देतो आहे, तेव्हा त्याला पाठिंबा दिला जातो. शेवटी उद्दिष्ट एकच असतं, संघाचा विजय. संघ जिंकतो तेव्हा प्रत्येकजण आनंदी असतो.”

पुढे अय्यर म्हणाला, “भले आपल्याला संधी मिळाली नाही, पण प्रामाणिकपणे कामगिरी करत राहणं आवश्यक आहे. कोणी पाहत नसतानाही आपण आपलं काम करत राहायला हवं.” श्रेयस अय्यरला आशिया चषकात संधी डावलल्यानंतर त्यासा ऑस्ट्रेलिया अ संघाविरूद्ध होणाऱ्या बहुदिवसीय सामन्यांसाठी भारतीय अ संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासह भारत अ संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, एन जगदीसन (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, हर्ष दुबे, आयुष बदोनी, नितीश कुमार रेड्डी, तनुष कोटियन, प्रसीध कृष्णा, गुरनूर ब्रार, खलील अहमद, मानव सुतार, यश ठाकूर (केएल राहुल आणि मोहम्मद सिराज दुसरा सामना खेळणार)