Why Suryakumar Yadav Withdraws wicket appeal IND vs UAE: आशिया चषक २०२५ मधील भारताच्या पहिल्याच सामन्यात संघाची उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली आहे. भारत आणि युएई यांच्यातील सामन्याची नाणेफेक कर्णधार सूर्यकुमार यादवने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. युएईने सुरूवात चांगली करण्याचा प्रयत्न केला, पण भारताचे गोलंदाज मात्र वरचढ ठरले. यादरम्यान कर्णधार सूर्याने एक असा निर्णय घेतला की ज्यामुळे चाहत्यांकडून त्याच कौतुक होत आहे.

भारताने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर युएईचा संघाला अवघ्या १३ षटकांत ५७ धावांवर सर्वबाद केलं. भारताकडून जसप्रीत बुमराहने संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यानंतर इतर गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत विकेट्सची रांग लावली. कुलदीप यादवने एका षटकात ३ विकेट्स घेतल्या आणि अखेरची विकेट घेत युएईला सर्वबाद केलं. तर शिवम दुबेने एका षटकात २ विकेट्स घेत कमालीची गोलंदाजी करत सामन्यात एकूण ३ विकेट्स घेतल्या.

शिवम दुबेच्या षटकात मैदानावर जी घटना घडली ती पाहून सर्वत्र टीम इंडिया आणि कर्णधाराचं कौतुक होत आहे. शिवम दुबे १३व्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर ध्रुव पराशरला पायचीत केलं. त्यानंतर रिव्ह्यू घेण्यात आला पण चेंडू बॅटला न लागल्याने तिसऱ्या पंचांनी बाद दिलं. बऱ्याच दिवसांनंतर गोलंदाजीला उतरलेल्या दुबेने आपल्या गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

ध्रुव पराशर बाद झाल्यानंतर जुनैद सिद्दीकी फलंदाजीला आला. दुसरा चेंडू निर्धाव राहिला, तिसरा चेंडू टाकण्यासाठी शिवम दुबेने रनअप घेतला. दुबे नॉन स्ट्राईकर एन्डवर पोहोचताच त्याच्या पाठीच्या इथे अडकवलेला टॉवेल पडला. यानंतर शिवमने टाकलेला चेंडू मारायला गेला, पण चुकला आणि चेंडू थेट सॅमसनच्या हातात गेला. सॅमसनने क्षणात बेल्स उडवत बाद झाल्याचं अपील केलं. तिसऱ्या पंचांकडून बाद आहे की नाही याचा निर्णय पोहोचला. तिसऱ्या पंचांनीही बाद दिलं.

सूर्यकुमार यादवने बाद असतानाही विकेटचं अपील का घेतलं मागे?

तिसऱ्या पंचांनी निर्णय देताच सूर्यकुमार यादव पंचांकडे पोहोचला आणि त्याने विकेटचं अपील मागे घेत असल्याचं सांगितलं. नेमकं घडलं काय तर… शिवम दुबे रनअप घेत असताना त्याचा टॉवेल पडला आणि फलंजदाजाचं लक्ष विचलित झालं. त्याने चेंडू मारायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तो टॉवेल पडलं त्याकडे खुणावत होता. त्यामुळे फलंदाज परत क्रीजच्या आत गेला नाही आणि सॅमसनने त्याला लगेच बाद केलं. टॉवेलमुळे फलंदाजाचं लक्ष विचलित झाल्याने तो क्रीजवर गेला नाही आणि बाद झाला. या कारणामुळे सूर्याने आणि टीम इंडियाने विकेटचं अपील मागे घेतलं. सूर्यकुमारने मैदानावरील पंचांशी बोलत विकेटचं अपील मागे घेतलं.

सूर्यकुमार यादवची खेळभावना पाहून त्याचं कौतुक होत आहे. भारताने खेळभावना दाखवत खिलाडू वृत्तीच्या जोरावर आणि उत्कृष्ट गोलंदाजीसह युएईला सर्वबाद केलं आणि विजयासाठी भारताला ५८ धावांचं लक्ष्य मिळालं.