आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

‘करोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ मोठय़ा धाडसाने मंगळवारपासून फिलिपिन्समध्ये सुरू होणाऱ्या आशिया सांघिक स्पर्धेसाठी दाखल झाला आहे. या स्पर्धेत भारताचे मुख्य लक्ष्य पदक जिंकणे आणि ऑलिम्पिकच्या दृष्टीने जागतिक क्रमवारीतील गुणांची कमाई करणे हे आहे. भारताच्या महिला संघाने मात्र ‘करोना’ विषाणूच्या संसर्गामुळे या स्पर्धेतून माघार घेतली.

फिलिपिन्समध्ये सध्या ‘करोना’चे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यातच चीनच्या एका प्रवाशाचा फिलिपिन्समध्येच ‘करोना’मुळे १ फेब्रुवारीला मृत्यू झाला होता. मात्र माजी अव्वल मानांकित किदम्बी श्रीकांत आणि २०१९ मधील जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील कांस्यपदक विजेता बी. साईप्रणित हे येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. त्या दोघांसोबत एच. एस. प्रणॉय, शुभंकर डे आणि लक्ष्य सेन यांचाही भारतीय संघात समावेश आहे.

‘करोना’मुळे फिलिपिन्स सरकारने चीन आणि हॉँगकॉँगच्या खेळाडूंना आपल्या देशात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे या स्पर्धेत चीन आणि हाँगकाँगचे खेळाडू खेळणार नाहीत. भारताच्या ‘ब’ गटात मलेशिया आणि कझाकस्तान या देशांचा सहभाग आहे. भारताची मंगळवारी कझाकस्तानविरुद्ध लढत असून गुरुवारी मलेशियाविरुद्ध लढत आहे. भारताने या स्पर्धेत २०१६ मध्ये कांस्यपदक मिळवले होते.

साईप्रणितच्या नेतृत्वाखाली रविवारीच बंगळूरू रॅपटर्सने प्रीमियर बॅडमिंटन लीगचे (पीबीएल) जेतेपद राखले. ‘पीबीएल’मध्ये साईप्रणितने एकेरीत दणदणीत विजयांची नोंद केली होती.