२२ ते २७ नोव्हेंबरदरम्यान इराणच्या गोरगान शहरात होणाऱ्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताच्या संभाव्य संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. संभाव्य संघात निवड झालेले ३६ खेळाडू सध्या ‘साई’च्या (Sports Authority of India) सोनेपत येथील शिबीरात सराव करत आहेत. १९ नोव्हेंबररोजी या शिबीराची सांगता होणार असून, यानंतर १२ जणांचा संघ निवडला जाईल. २०१६ साली झालेल्या कबड्डी विश्वचषकात भारताने इराणचा पराभव केला होता, त्यामुळे घरच्या मैदानावर खेळताना इराण आपल्या पराभवाचा बदला घेतो का हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – आशियाई अजिंक्यपद कबड्डी सराव शिबीरातून अनुप कुमारला वगळलं

यंदाच्या संघात निवड समितीने सिनीअर खेळाडूंना विश्रांती देत नवोदीतांना संघात जागा दिली आहे. ३६ जणांच्या यादीत हरियाणा, साई आणि सेनादलच्या खेळाडूंचा दबदबा पहायला मिळतो आहे. महाराष्ट्राच्या अवघ्या ३ खेळाडूंना या संभाव्य संघात जागा मिळाली आहे. असा आहे आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताचा संभाव्य संघ –

जयदीप (सेनादल), संतोष (कर्नाटक), सुरिंदर नाडा (हरियाणा), सचिन शिंगाडे (महाराष्ट्र), शिव ओम (हिमाचल प्रदेश), थिवकरन (तामिळनाडू), अजय कुमार (सेनादल), अजय ठाकूर (हिमाचल प्रदेश), दिपक हुडा (राजस्थान), के.प्रपंजन (तामिळनाडू), कमल किशोर (राजस्थान), काशिलींग अडके (महाराष्ट्र), मणिंदर सिंह (पंजाब), मोनू गोयत (सेनादल), पी. मल्लिकार्जुन (तेलंगणा), पवनकुमार कादियान (हरियाणा), प्रदीप नरवाल (सेनादल), राहुल चौधरी (उत्तर प्रदेश), राजेश मोंडल (रेल्वे), राजुलाल चौधरी (राजस्थान), रिशांक देवाडीगा (महाराष्ट्र), रोहित बालियान (उत्तर प्रदेश), रोहित कुमार (सेनादल), सचिन (राजस्थान), विकास कंडोला (साई), विशाल भारद्वाज (हिमाचल प्रदेश), वझीर सिंह (हरियाणा), अमित नागर (दिल्ली), अमित हुडा (हरियाणा), मोहीत छिल्लर (रेल्वे), नितीन तोमर (सेनादल), संदीप नरवाल (हरियाणा), आशिष सांगवान (हरियाणा), सुरिंदर सिंह (पंजाब), सुरजीत (सेनादल), महेंद्र धाका (राजस्थान)

महाराष्ट्राचे खेळाडू नेमके कुठे मार खातात???

एकेकाळी कबड्डीवर आपलं वर्चस्व गाजवणाऱ्या महाराष्ट्राचं प्रभुत्व आता कमी झालंय. पुर्वी भारतीय संघात महाराष्ट्राच्या खेळाडूंचा भरणा असायचा, मात्र संघटनांच्या राजकारणाचा फायदा, उत्तरेकडच्या राज्यांनी घेतला. सध्या कबड्डी जनार्दनसिंह गेहलोत यांच्या संघटनेचा दबदबा आहे. त्यामुळे भारतीय संघात जागा मिळताना, उत्तरेकडेच्या राज्यातील खेळाडूंना संधी मिळते अशी क्रीडाक्षेत्रात चर्चा आहे.

मात्र भारतीय संघात महाराष्ट्राच्या खेळाडूंची संख्या कमी होण्यास काही अंतर्गत गोष्टीही कारणीभूत आहेत का? या संदर्भात ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने माजी राष्ट्रीय कबड्डीपटू मेघाली कोरगावकर यांच्याशी संवाद साधला. “महाराष्ट्राच्या खेळाडूंना भारतीय संघात अधिकाधिक जागा मिळावी यासाठी आपली संघटना सतत प्रयत्नशील असते, मात्र त्यांचे प्रयत्न हे तोकडे पडतात. त्यात महाराष्ट्रातील काही खेळाडू हे शारीरिक तंदुरुस्तीच्या पातळीवर अजुनही कच्चे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धांमधल्या त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो. इथे उत्तरेकडच्या राज्यातले खेळाडू पुढे निघून जातात. याचसोबत शासकीय सेवेत असणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना सरावासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र इतर राज्यांमध्ये खेळाडूंना सरावासाठी पुरेसा वेळ दिला जातो.” अशा अनेक बाबींवर महाराष्ट्राचे खेळाडू कमी पडतात. त्यामुळे जीव तोडून मेहनत करणे आणि संघात आपलं स्थान पक्क करणे हेच आपल्या हातात असल्याचं मेघाली कोरगावकर म्हणाल्या.