शामकेंट : कझाकस्तान येथे सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारताच्या एलावेनिल वलारिवन हिने शुक्रवारी सुवर्णपदकाची कमाई केली. तिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात हे यश मिळवले. या स्पर्धेत भारताने पदकतालिकेतील अग्रस्थान कायम राखले असून, त्यांची आता १७ सुवर्ण, ८ रौप्य आणि ८ कांस्य अशी ३३ पदके झाली आहेत.
चीन आठ सुवर्ण, पाच रौप्य आणि एक कांस्य अशा एकूण १४ पदकांसह दुसऱ्या, तर कझाकस्तान प्रत्येकी तीन सुवर्ण आणि रौप्य, तसेच पाच कांस्य अशी एकूण १५ पदके मिळवून तिसऱ्या स्थानावर आहे.
तमिळनाडूच्या २६ वर्षीय एलावेनिलने अंतिम फेरीत २५३.६ गुणांचा कमाई करुन चीनच्या झिनलू पेंग हिला दशांश सहा गुणांनी मागे टाकून सुवर्णयश मिळवले. एलावेनिलचे आशियाई स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक ठरले. यापूर्वी २०१९ मध्ये एलावेनिलने सुवर्णकमाई केली होती. यंदा एलावेनिलसह अंतिम फेरी गाठलेल्या मेहुल घोष हिला २०८.९ गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पात्रता फेरीत एलावेनिल ६३०.७ गुणांसह आठव्या क्रमांकावर होती. मेहुली ६३०.३ गुणांसह दहाव्या स्थानावर राहिली. मात्र, भारताच्या अन्य स्पर्धक आर्या बोरसे (६३३.२) आणि सोनम मस्कर (६३०.५) या केवळ मानांकन गुणांसाठी पात्र ठरल्यामुळे मेहुलीला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला.
या स्पर्धेत भारताचे कुमार नेमबाज कमालीच्या सातत्याने कामगिरी करत असून, एलावेनिलने पटकावलेले सुवर्णपदक हे वरिष्ठ गटातील दुसरेच वैयक्तिक सुवर्ण आहे. पहिले सुवर्णपदक स्कीट प्रकारात अनंतजीत सिंग नरुकाने मिळवले होते.
कुमार नेमबाजांचे वर्चस्व भारताच्या कुमार नेमबाजांचा अचूक लक्ष्यभेद कायम राहिला. शांभवी श्रवण, हृदय श्री कोंडूर, ईशा अनिल या महिला संघाने १० मीटर एअर रायफल प्रकारात १८९६.२ गुणांसह सांघिक सुवर्णपदक मिळवले. त्यांनी या यशाने कुमार गटातील जागतिक आणि आशियाई विक्रमाचीही नोंद केली.