आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ग्रीको-रोमन प्रकारातील ७७ किलो वजनी गटात भारताच्या गुरप्रीत सिंगने आणि ८७ किलो वजनी गटात सुनील कुमारने रौप्यपदक पटकावले.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुरप्रीतसमोर कोरियाच्या ह्य़ेऑनवू किमचे आव्हान समोर होते. या लढतीत किमने ८-० असे वर्चस्व राखल्यामुळे गुरप्रीत सिंगला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र या सामन्यापूर्वी गुरप्रीतची वाटचाल अत्यंत प्रभावी होती. गुरप्रीतने कतारच्या बाखित शरिफ के बद्रवर १०-० अशा दणदणीत फरकासह विजय मिळवला. त्यापूर्वी कझाकस्तानच्या तामेरलान शादुकोयेव्हला संघर्षपूर्ण लढतीत ६-५ असे नमवले होते.

याशिवाय, भारताच्या सुनील कुमारने ८७ किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली. परंतु सुनीलला इराणच्या हुसेन अहमद नुरीशी झुंज देताना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सुनीललादेखील रौप्यवर समाधान मानवे लागले. सुनीलने उपांत्य फेरीत कझाकस्तानाच्या अझामत कुस्तुबायेव्हला ६-६ अशा बरोबरीनंतर तांत्रिक गुणांआधारे अंतिम फेरी गाठली. त्याआधी त्याने ताजिकिस्तानच्या तोखिरझोन ओखोनोव्हला १४-७ असे पराभूत केले.

तसेच १३० किलो वजनी गटातील भारताचा प्रेम हादेखील पदकाच्या शर्यतीत होता. मात्र, प्रेमला कांस्यपदकासाठीच्या झुंजीत कझाकस्तानच्या दामिर कुझेमबायेव्हकडून पराभव पत्करावा लागल्याने त्याचे पदक हुकले.  त्याआधी प्रेमला उझबेकिस्तानच्या मुमिनिजोन अब्दुल्लाएवकडून उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र, मुमिनिजोन अंतिम फेरीत पोहोचल्याने प्रेमला पुन्हा संधी मिळाली होती. त्याशिवाय ५५ किलोमध्ये मनजीत, तर ६३ किलो वजनी गटात विक्रम कुराडे हे पराभूत झाल्याने या दोन गटांमधील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.