कृष्णकुमार राणे आणि रश्मी शेरगर यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकावले. सुवर्णपदकांच्या यादीत भर टाकत हरयाणाने गुणतालिकेत महाराष्ट्राला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले. सेनादल अव्वल स्थानी कायम आहे.
पुरुषांमध्ये हरयाणाच्या धर्मबीरने १०.४६ सेकंदात शर्यत पूर्ण करत सुवर्णपदकावर कब्जा केला. ओदिशाच्या अमिया मल्लिकने १० मिनिटे आणि ६४ सेकंदात शर्यत पूर्ण करत रौप्य पदक पटकावले. १० मिनिटे आणि ६५ सेकंद अशा अवघ्या एका सेकंदाच्या फरकाने कृष्णकुमारला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
महिलांमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या ओदिशाच्या द्युती चंदने ११ मिनिटे आणि ७६ सेकंदात शर्यत पूर्ण करत सुवर्णपदकाची कमाई केली. केरळच्या संथिनी वल्लीकडने ११ मिनिटे आणि ८४ सेकंदात शर्यत पूर्ण करत रौप्यपदक नावावर केले. ३ सेकंदानी मागे असलेल्या रश्मीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
कबड्डीत महिला उपांत्य फेरीत
महाराष्ट्राच्या महिला कबड्डी संघाने उपांत्य फेरीत आगेकूच केली. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत महाराष्ट्राने हिमाचल प्रदेश संघावर १६-११ असा विजय मिळवला. गटातल्या तिन्ही लढत जिंकत महाराष्ट्राने दमदार वर्चस्व गाजवले. महाराष्ट्रातर्फे अभिलाषा म्हात्रे, स्नेहल शिंदे यांनी शानदार चढाया केल्या तर मीनल जाधवने अचूक पकडी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पुरुषांमध्ये कर्नाटकने
महाराष्ट्रावर ४३-३७ असा विजय मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Athlete krishnakumar won bronze in national games
First published on: 12-02-2015 at 03:15 IST