क्रिकेटच्या सामन्यांनाही लाजवेल असा चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. हृदयाचे ठोके चुकवणारे थरारक क्षण.. सामना संपायला काही सेकंदाचा अवधी असताना गोलशून्य बरोबरी.. त्यामुळे अतिरिक्त वेळेची मेजवानी मिळणार असे गृहित असताना यापूर्वी इंडियन सुपर लीगमध्ये फक्त पाच मिनिटे खेळलेला मोहम्मद रफीक अ‍ॅटलेटिको डी कोलकातासाठी धावून आला. भरपाई वेळेत रफीकने हेडरद्वारे केलेल्या गोलाच्या बळावर सौरव गांगुलीच्या मालकीच्या कोलकाताने पहिल्यावहिल्या आयएसएल जेतेपदाला गवसणी घातली.
पहिल्या सत्रात एक-दोन वेळा गोल करण्याचे प्रसंग वगळता खेळामध्ये जान दिसत नव्हती. दुसऱ्या सत्रात मात्र दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत गोलरक्षकांवर दडपण आणले. ७९व्या मिनिटाला केरळचा अव्वल खेळाडू मायकेल चोप्राने मारलेला फटका कोलकाताचा गोलरक्षक एडेल बेटेने अडवला. तीन मिनिटांनंतर भारतीय वंशाचा इंग्लंडचा आघाडीवीर चोप्राला गोल करण्याची सुरेख संधी होती. कदाचित, हा गोल केरळ ब्लास्टर्सला आयएसएलचे पहिलेवहिले जेतेपद मिळवून गेला असता. पण नशीब केरळच्या बाजूने नव्हते. कोलकाताच्या पाच बचावपटूंची भक्कम िभत भेदल्यानंतर चोप्रासमोर फक्त बेटेचे आव्हान होते. गोलजाळ्यापासून १०-१२ फुटांवर असलेल्या चोप्राने मारलेला फटका बेटेने डाव्या बाजूने हवेत झेप घेऊन बाहेर ढकलला. या सुरेख कामगिरीमुळे बेटेने केरळचा गोल वाचवला नाही तर कोलकाताला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
तीन वर्षांपूर्वी युनायटेड स्पोर्ट्स क्लबला डय़ुरँड चषकाचे जेतेपद मिळवून देताना मोहम्मदने निर्णायक गोल लगावला होता. त्यामुळे ७४व्या मिनिटाला मैदानावर उतरलेला मोहम्मद काहीतरी करिश्मा दाखवणार, अशी खात्री कोलकाताचे प्रशिक्षक अँटोनियो हबास यांना होती. भरपाई वेळेत जाकुब पोडानीने दिलेल्या क्रॉसवर मोहम्मदने हेडरद्वारे चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. स्पर्धेतील पहिला गोल लगावणारा मोहम्मद आयएसएलमधील सर्वोत्तम उभरता खेळाडू ठरला. समारोप सोहळ्यात चीनी कलाकारांच्या अदाकारीने चाहत्यांची मने जिंकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेलिब्रेटिंची मांदियाळी
चेन्नईन एफसीचा मालक अभिनेता अभिषेक कपूर, नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचा मालक जॉन अब्राहम तसेच क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि अभिनेता आमीर खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईत अंतिम सामना असूनही मुंबई सिटी एफसीचा मालक रणबीर कपूर अनुपस्थित असल्याची चर्चा अधिक रंगली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atletico de kolkata pip kerala blasters to win inaugural isl crown
First published on: 21-12-2014 at 07:02 IST