भारताच्या सोमदेव देववर्मन व युकी भांबरी यांनी एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत आगेकूच राखली. अग्रमानांकित सोमदेवला न्यूझीलंडच्या मायकेल व्हीनसविरुद्ध ६-७ (४-७), ६-०, ६-३ असा विजय मिळविताना झगडावे लागले. सातव्या मानांकित भांबरीला गेरार्ड ग्रॅनोलर्सविरुद्ध विजय मिळविताना फारसे कष्ट करावे लागले नाहीत. त्याने एकतर्फी झालेली ही लढत ६-२, ६-१ अशी जिंकली.
पहिला सेट गमावल्यानंतर सोमदेवने सव्‍‌र्हिस व परतीच्या फटक्यांवर नियंत्रण मिळवत विजयश्री खेचून आणली. सोमदेवने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ केला. त्याला उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या जोर्डी सॅम्पर मोन्ताना याच्याशी खेळावे लागेल.  उपांत्यपूर्व फेरीत भांब्रीपुढे फ्रान्सच्या लुकास पौलेई याचे आव्हान असणार आहे.
साकेत मिनेनी व सनम सिंग यांनीही विजय मिळवले. मिनेनीने थॉमस फॅबिआनो याच्यावर ६-३, ६-२ असा सनसनाटी विजय मिळविला. सनमने श्रीराम बालाजीचे आव्हान ६-१, ४-६, ७-६ (७-१) असे संपुष्टात आणले.