Australia vs Pakistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील १८ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर पाकिस्तानचे आव्हान आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. सलग दुसऱ्या विजयाकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष लागले आहे. गेल्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेचा पराभव केला होता. त्याचवेळी पाकिस्तानला भारताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. बाबर आझमचा संघ विजयी मार्गावर परतण्यास इच्छुक आहे. तत्पूर्वी पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात उपकर्णधार शादाब खान खेळत नसल्याचे त्याने नाणेफेकीदरम्यान सांगितले. शादाबच्या जागी उसामा मीरला संधी देण्यात आली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने एकही बदल केलेला नाही.
दोन्ही संघावरही विजयासाठी दबाव –
पाकिस्तान दबावाखाली निर्भय क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो, पण यावेळी भारताविरुद्धच्या सामन्यात १९९२ चा चॅम्पियन संघ दबाव सहन करू शकला नाही. संपूर्णपणे एकतर्फी पद्धतीने भारताने सात गडी राखून विजय मिळवला. हैदराबादमध्ये श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानची कामगिरी चांगली झाली असेल, पण श्रीलंकेचे आक्रमणही अव्वल दर्जाचे नव्हते.
आता सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे आणि पाच वेळचा चॅम्पियन संघ स्वतःच्याच समस्यांशी झुंजत आहे. ऑस्ट्रेलियाचे आव्हान सध्या पाकिस्तानसमोर भारतासारखे तगडे नसेल, पण त्यांना हरवणे सोपे असणार नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानविरुद्धचा विक्रम ६९-३४ असा आहे आणि ५० षटकांच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने सहा सामने जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत.
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग इलेव्हन: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.
पाकिस्तान संघाची प्लेइंग इलेव्हन: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.