AUS vs PAK 1st Test, Usman Khwaja: ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजा याने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव सत्रादरम्यान असे काही बूट घातले होते, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. वास्तविक, ख्वाजाच्या बुटांवर काही घोषणा लिहिण्यात आल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली. ख्वाजाच्या बुटांवर “स्वातंत्र्य हा मानवी हक्क आहे आणि ‘जीवन जगण्याचा अधिकार सर्वांसाठी समान आहे,” असे लिहिले होते. यावर सोशल मीडियात चर्चेला उधाण आले आहे.

“हे बूट आणि त्यावर लिहिलेल्या संदेशासह पर्थमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळण्याची ख्वाजाची योजना होती,” असे ऑस्ट्रेलियन माध्यमात बोलले जात आहे. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियन बोर्डाने त्याला कडक ताकीद देत आयसीसीच्या नियमांची आठवण करून दिली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणी ‘आयसीसीच्या नियमांचा’ हवाला दिला, त्यानंतर ख्वाजाला ते बूट काढून ठेवावे लागले.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही आमच्या खेळाडूंच्या वैयक्तिक मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचे समर्थन करतो, परंतु आयसीसीचे काही नियम आहेत जे वैयक्तिक संदेश प्रदर्शित करण्यास बंदी घालतात. त्यांनी ते नियम पाळावे अशी आशा आम्ही खेळाडूंकडून बाळगतो. त्याचे उल्लंघन होणार नाही, ते कायम राखण्याची अपेक्षा आम्ही करतो.” ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सलाही या विषयावर विचारण्यात आले. त्यानंतर त्याने खुलासा केला की, “ख्वाजाने पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी ते बूट घालू नये, त्याच्या या कल्पनेला मी नकार दिला होता.”

हेही वाचा: IND vs SA 2nd T20: सूर्यकुमार-रिंकू सिंहचे अर्धशतक व्यर्थ! दक्षिण आफ्रिकेचा भारतावर पाच गडी राखून दणदणीत विजय

कॅप्टन कमिन्स काय म्हणाला?

कमिन्स म्हणाला, “त्याच्या बूटवर काही शब्द होते. मला वाटते की प्रत्येकाच्या स्वतःच्या वैयक्तिक कल्पना आहेत. सर्वांना स्वातंत्र्य देणे हा आमच्या संघाचा सर्वात मजबूत मुद्दा आहे. याबाबत आज मी ख्वाजाशी पूर्ण चर्चा केली. मोठा गदारोळ माजवण्याचा त्याचा हेतू होता असे मला वाटत नाही, परंतु आम्ही त्याचे समर्थन करतो. तो घालणार नसल्याचे ख्वाजाने सांगितले.”

कमिन्स म्हणाला की, “आयसीसीच्या नियमांबद्दल माहिती दिल्यानंतर ख्वाजाने ते बूट घातले नाहीत.” तो पुढे म्हणाला, “मला वाटते की आयसीसीच्या नियमांनी त्याच्या या कृतीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मला वाटते की ‘सर्व जीवन समान आहेत’ या संदेशात मोठी समस्या आहे, याबद्दल कोणी फारशी तक्रार करू शकेल असे मला वाटत नाही. सर्व जीव समान आहेत याच्याशी माझेही समर्थन आहे. कारण, जगण्याचा सर्वांना अधिकार आहे.”

हेही वाचा: IND vs SA: दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाने चाहते नाराज; सोशल मीडियावर म्हणाले, “बिश्नोई आणि श्रेयसला…”

या विषयावर आयसीसीचे नियम काय आहेत?

आयसीसीच्या नियमांनुसार, “युद्ध किंवा त्यासंबंधित विषयांशी असलेले आणि शांततेच्या नियमांचे पालन न करणारे कोणतेही कपडे किंवा उपकरणे, वस्तू वापरण्यास सक्त मनाई केली जाईल. विशेषत:, राष्ट्रीय लोगो, व्यावसायिक लोगो, इव्हेंट लोगो, निर्मात्याचा लोगो, खेळाडूचा बॅट लोगो, धर्मादाय लोगो किंवा गैर-व्यावसायिक लोगो याशिवाय इतर कोणताही लोगो क्रिकेट जर्सी किंवा क्रिकेट वस्तूंवर प्रदर्शित करण्याची परवानगी दिली जाणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, “जर एखाद्या सामन्यात सामना अधिकाऱ्याला या नियमांचे पालन न करणाऱ्या कपड्यांबद्दल किंवा वस्तूंची जाणीव झाली, तर तो किंवा ती आक्षेपार्ह व्यक्तीला खेळाच्या मैदानात खेळण्यापासून रोखेल. जोपर्यंत खेळाडू प्रतिबंधित कपडे किंवा वस्तू काढत नाही किंवा योग्यरित्या झाकत नाही तोपर्यंत त्याला मैदानावर परवानगी दिली जाणार नाही.” ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका १४ डिसेंबरपासून सुरू होत आहे.