AUS vs SA, WTC Final Day 3 Highlights: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत सुरू आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी विजेत्या संघाचा निकाल लागू शकतो. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २८२ धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवसाअखेर २१३ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार तेंबा बावूमा एका पायावर लढला. त्याच्या पायाला दुखापत झाली असतानाही त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली. तर एडेन मारक्रमने दमदार शतकी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी अवघ्या ६९ धावांची गरज आहे.

हेजलवूड- स्टार्क नडले

या सामन्यातील दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे ८ फलंदाज तंबूत परतले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला केवळ २ फलंदाजांना बाद करायचं होतं. कगिसो रबाडाने नाथन लायनला अवघ्या २ धावांवर माघारी धाडलं. इथून दक्षिण आफ्रिकेकडे ऑस्ट्रेलियाला कमी धावात रोखण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, स्टार्क आणि हेजलवूड दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना नडले. ज्या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळत नव्हती, त्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. दोघांनी दहाव्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. यासह ही जोडी आयसीसीच्या फायनलमध्ये दहाव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करणारी जोडी ठरली. या भागीदारीच्या बळावर ऑस्ट्रेलियाला २०७ धावांपर्यंत मजत मारता आली. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २८२ धावांचे आव्हान ठेवले.

दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २८२ धावांचे आव्हान

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २८२ धावांचे आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेकडून रायन रिकल्टन आणि एडेन मारक्रमची जोडी मैदानावर आली. या जोडीकडून चांगल्या सुरूवातीची अपेक्षा होती. मात्र, रायन रिकल्टन स्वस्तात माघारी परतला. त्याला मिचेल स्टार्कने ६ धावांवर माघारी धाडलं. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुल्डरने एडेन मार्करमला चांगली साथ दिली. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ६० धावा जोडल्या. मुल्डरने २७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुल्डर बाद झाल्यानंतर कर्णधार तेंबा बावूमा फलंदाजीला आला. गोलंदाजांना खेळपट्टीतून मदत मिळत नव्हती. याचा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी चांगलाच फायदा घेतला. दोघांनी संथगतीने सुरूवात केली. त्यानंतर जेव्हा जेव्हा धावा करण्याची संधी मिळाली, तेव्हा दोघांनी धावा केल्या. मुख्य बाब म्हणजे, कर्णधार तेंबा बावूमा दुखापतग्रस्त होता. त्याला धावताना त्रास होत होता. मात्र,तरीही तो मैदानावर उभा राहिला आणि एकेरी- दुहेरी धावा घेणं सुरू ठेवलं. यासह त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दिवसाअखेर तेंबा बावूमा १२१ चेंडूत ६५ धावांवर नाबाद परतला आहे. तर एडेन मारक्रम १५९ चेंडूत १०२ धावांवर नाबाद परतला आहे.