AUS vs WI 2nd Test : पदार्पण कोणत्याही खेळाडूसाठी संस्मरणीय क्षण असतो. पदार्पणाच्या सामन्यात थोडीशी धाकधूक, चिंताही असते. पण वेस्ट इंडिजच्या केव्हिन सिनक्लेअरने पहिल्या कसोटी सामन्यात पहिली विकेट मिळविल्यानंतर अफलातून कोलांटी उडी मारत विजयाचा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा केला. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील डे-नाईट टेस्ट ब्रिस्बेन इथे सुरू आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाला फिरकीपटू सिनक्लेअरने बाद केलं. स्लिपमध्ये अथांझने त्याचा झेल टिपला. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या ख्वाजाला केव्हिनने ७५ धावांवर बाद केलं. स्लिपमध्ये झेल टिपला जातोय लक्षात येताच केव्हिनने उजवीकडे धाव घेत कोलांटीउडी मारली. जल्लोषातही त्याचं टायमिंग चुकलं नाही. ब्रिस्बेनच्या मैदानावरच्या चाहत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटासह केव्हिनचं पहिल्या विकेटसाठी आणि अनोख्या सेलिब्रेशनसाठी कौतुक केलं.
करोना पॉझिटिव्ह असूनही कॅमेरून ग्रीन मैदानात खेळायला उतरला; हेजलवूडने टाळी देण्यास दिला नकार
पहिली कसोटी गमावलेल्या वेस्ट इंडिजने डे-नाईट टेस्टमध्ये पहिल्या डावात ३११ धावांची मजल मारली. काव्हेम हॉजने ७१ तर जोशुआ डी सिल्व्हाने ७९ धावांची खेळी केली. पदार्पणवीर केव्हिन सिनक्लेअरने ५० धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल स्टार्कने ४ विकेट्स पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने २८९/९ धावांवर डाव घोषित केला. पिछाडीवर असतानाच ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला. ख्वाजाने ७५ तर अॅलेक्स कॅरेने ६५ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाची अवस्था ५४/५ अशी झाली होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने ९ चौकार आणि एका षटकारासह ६५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कमिन्सच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजला मोठी आघाडी मिळू शकली नाही. वेस्ट इंडिजतर्फे अल्झारी जोसेफने ४ तर केमार रोचने ३ विकेट्स पटकावल्या.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात १३/१ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडे ३५ धावांची आघाडी आहे. वेस्ट इंडिजने १९९७ नंतर ऑस्ट्रेलियात कसोटी जिंकलेली नाही. या सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाच्या संघाला अडचणीत टाकलं होतं. अजूनही वेस्ट इंडिजला पुनरागमन करण्याची संधी आहे. वेस्ट इंडिजचा संघ या दौऱ्यात २ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ३ ट्वेन्टी२० सामने खेळणार आहे.
२४ वर्षीय केव्हिन सिनक्लेअरने वेस्ट इंडिजसाठी ७ वनडे आणि ६ ट्वेन्टी२० सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २१ सामन्यात केव्हिनने ६६ विकेट्स पटकावल्या आहेत. प्रमुख खेळाडू अनुपलब्ध असल्याने निवड समितीने या दौऱ्यासाठी अनुनभवी संघ निवडला आहे.