Australia vs South Africa, Day 2 Highlights: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये सुरू आहे. दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. सुरूवातीच्या दोन्ही दिवशी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१२ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेला १३८ धावांवर आटोपला. यासह ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात आघाडी घेतली. दरम्यान दुसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाचा संघ २१८ धावांनी आघाडीवर आहे.
दुसऱ्या दिवसाची सुरूवात झाली, त्यावेळी पहिल्या दिवशी नाबाद माघारी परतलेली टेंबा बावुमा आणि बेडिंघमची जोडी मैदानावर आली. पहिल्या दिवसातील तिसऱ्या सेशनमध्ये दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज संघर्ष करताना दिसून आले होते. मात्र,दुसऱ्या दिवसातील पहिल्याच सेशनमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दमदार सुरूवात केली. बावुमा आणि बेडिंघमने काही आकर्षक शॉट्स मारून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर दबाव टाकला. पहिला सेशन दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच्या नावावर राहिला. मात्र, दुसऱ्या सेशनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने या सेशनमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ५ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. इथून पारडं ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकलं.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर आटोपला
पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज ४३ धावांवर माघारी परतले होते. दुसऱ्या दिवशी टेंबा बावुमाने ३६ धावांची खेळी केली.डेव्हिड बेडिंघमने ४५ धावांची खेळी केली. या जोडीने मिळून दक्षिण आफ्रिकेचा डाव १०० धावांच्या पार पोहोचवला. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक ६ गडी बाद केले. यासह त्याने अनेक मोठे रेकॉर्ड्स मोडून काढले. पॅट कमिन्स हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला. या रेकॉर्डमध्ये त्याने जसप्रीत बुमराहला मागे सोडलं आहे.
तिसरा सेशन दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी गाजवला
दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या १३८ धावांवर आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ७४ धावांची मोठी आघाडी मिळाली. खेळपट्टी पाहता ७४ धावांची आघाडी खूप मोठी होती. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. या डावातही उस्मान ख्वाजा फ्लॉप ठरला. तो अवघ्या ६ धावांवर माघारी परतला. तर कॅमरून ग्रीन शून्यावर माघारी परतला.
सुरूवातीला २ मोठे धक्के बसल्यानंतर मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथने मिळून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, मार्को यान्सेनने मार्नस लाबुशेनला २२ धावांवर, तर लुंगी एन्गिडीने स्टीव्ह स्मिथला १३ धावांवर माघारी धाडलं. इथून ऑस्ट्रेलियाचा डाव गडबडला. त्यानंतर ट्रॅव्हिस हेड ९, ब्यू बेबस्टर ९ आणि पॅट कमिन्स अवघ्या ६ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियाकडून शेवटी फलंदाजी करताना मिचेल स्टार्क आणि अॅलेक्स कॅरी या जोडीने महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी केली. कॅरी ४३ धावा करत माघारी परतला.
दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात लुंगी एन्गिडीने सर्वाधिक ३, कगिसो रबाडाने २, मार्को यान्सेन आणि मुल्डरने प्रत्येकी १-१ गडी बाद केला आहे. दुसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाला ८ गडी बाद १४४ धावा करता आल्या आहेत. यासह ऑस्ट्रेलियाने २१८ धावांची आघाडी घेतली आहे.